Top Post Ad

गुरचरण जमीन म्हणून अधिकृत नोंद असताना अचानक ती खाजगी कंपनीच्या मालकीची

कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे. गावातील गुरांच्या चाऱ्यासाठी राखीव असलेली गुरचरण जमीन, जी २०२३ पर्यंत अधिकृत नोंदींमध्ये गुरचरण म्हणून दाखवली जात होती, ती अचानक खाजगी कंपनीची असल्याचे सांगण्यात येत आहे. हा केवळ प्रशासकीय बदल नसून हा स्पष्टपणे मोठ्या प्रमाणावरचा जमीन घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित यंत्रणेतील लोकांच्या संगनमताने ही जमीन खाजगी कंपनीला देण्यात आल्याचा गंभीर संशय आहे. त्यानंतर त्या ठिकाणी १००-१५० वर्षे जुनी झाडे तोडण्यात आली हा पर्यावरणावर आणि गावकऱ्यांच्या हक्कांवर उघड डाका असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी केला आहे.. 

गंभीर बाब म्हणजे, संबंधित अधिकारी सांगतात की "आम्ही गावकऱ्यांना माहिती देण्यासाठी पोस्टाने पत्रे पाठवली. " पण ती पत्रे नेमकी कोणाला, कधी आणि कुठे पोहोचली? गावातील एकाही नागरिकाला अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. लोकांपर्यंत कधीच न पोहोचणारी पत्रे पाठवली असा दावा करून प्रशासन स्वतःची जबाबदारी झटकत आहे. हा प्रकार संशय अधिक बळकट करणारा आहे. याबाबत मोरेंनी स्वतः तलाठी कार्यालयात जाऊन जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. "अर्ज करा, अपील करा" असे सांगून वेळकाढूपणा केला जात आहे..  २०२३ पर्यंत गुरचरण म्हणून असलेली जमीन अचानक खाजगी कशी झाली? कंपनीने दावा केला तेव्हा तत्काळ चौकशी का झाली नाही? या सर्व प्रक्रियेमागे मोठा आर्थिक व्यवहार आणि संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय मोरे यांनी व्यक्त केला आहे.

हा प्रकार आम्ही अजिबात सहन करणार नाही. या घोटाळ्यात सामील असलेल्या तलाठ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे.  गरज भासल्यास हा संपूर्ण विषय महसूल मंत्र्यांपर्यंत आणि राज्य शासनापर्यंत नेण्यात येईल. कोळशेत गावातील ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू आणि शेवटपर्यंत लढा देऊ. गावकऱ्यांच्या हक्कांवर डाका टाकणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे महेश मोरे यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com