क्रांतिकारी लेखक व चिंतक बाबुराव बागुल यांच्या चिंतनशील लेखनामुळे दलित आंबेडकरी साहित्याचा भक्कम पाया रचला गेला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने बाबुराव बागुल यांच्या स्मृतिदिनानिमित्त २६ मार्च रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे प्राचार्य म.ना. वानखडे, प्रा. म.भी. चिटणीस आणि बाबुराव बागुल स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना केतकर म्हणाले की, बाबुराव बागुल यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना केवळ सांस्कृतिक व वैचारिकच नव्हे तर राजकीय महत्त्वही आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोककला देश-विदेशात पोहोचवणारे लोककलावंत व लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ विभाग प्रमुख गणेश चंदनशिवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी, लेखक व विचारवंत शिवा इंगोले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबुराव बागुल, म.ना. वानखडे आणि म.भी. चिटणीस यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. या प्रसंगी दिवंगत बाबा आढाव, दिवंगत लेखक जनार्धन वाघमारे, तसेच जयसिंगराव पवार आणि रणजित मेश्राम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव नाना आहिरे यांनी केले.
प्राचार्य डॉ. म.ना. वानखडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकुर यांना, क्रांतिकारी लेखक बाबुराव बागुल पुरस्कार जागतिक कीर्तीचे चित्रकार प्रा. प्रकाश भिसे यांना, तर प्रा. म.भी. चिटणीस स्मृती पुरस्कार दिवंगत बाबा आढाव (मरणोत्तर) यांना कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, पुस्तक आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अध्यक्ष शिवा इंगोले यांनीही समयोचित विचार मांडले. पुरस्कार स्वीकारताना प्रा. प्रकाश भिसे आणि बापू ठाकुर यांनी या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात सातारा येथे होणाऱ्या नियोजित विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर संभाजी भगत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुधाकर सरवदे यांनी केले. समारंभास बाबुराव बागुल यांच्या कन्या नंदा अहिरे, विश्वास उटगी, मधू मोहिते, कॉ. उदय चौधरी, शाहीर संभाजी भगत, सुधीर ढवळे, सुबोध मोरे, सुमेध जाधव, भटू जगदेव, व्ही. जी. सपकाळ गुरुजी, जालिंदर यादव, दिलीप भांगरे, रमाकांत जाधव, आनंदा होवाळ, डी. एस. सावंत, सागर तायडे, सुधाकर जाधव, सुबोध शाक्यरत्न, अविनाश कदम, प्रभाकर महाले, प्रा. कुसुम त्रिपाठी, अशोक पवार, रवी जोशी, सुरेश जाधव, पालशेतकर यांच्यासह परिवर्तनवादी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लेखक भास्कर बोराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 टिप्पण्या