Top Post Ad

मुंबई शहर ग्रंथोत्सवात दुर्मिळ ग्रंथांचे जतन आणि डिजिटलायझेशन प्रकल्पाची महापौरांनी केली पाहणी

 "वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे," अशी ग्वाही मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात (दिनांक २८ मार्च ) आयोजित 'मुंबई शहर ग्रंथोत्सव' मध्ये महापौर रितू तावडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट ज्येष्ठ व बाल सभासदांचा महापौर  रितू तावडे यांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.


ग्रंथोत्सवातील शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयाच्या दालनास भेट देऊन महापौरांनी 'भारताचे संविधान' (सुधारित आवृत्ती २०२५) हा ग्रंथ स्वत: खरेदी केला. हा अमूल्य ग्रंथ सर्व नगरसेवकांकडे असायला हवा, अशी सूचना करून त्यांनी याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासह इतरही विविध ग्रंथ, पुस्तके यांची महापौरांनी खरेदी केली.संदर्भ विभागात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले. इतिहासाचा हा ठेवा जतन करणे ही काळाची गरज असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या ग्रंथसंग्रहालयातील डिजिटलायझेशन प्रकल्पाची महापौरांनी बारकाईने पाहणी केली. दुर्मिळ ग्रंथ आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कसे जतन केले जातात, या स्कॅनिंग प्रक्रियेची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांची ग्रंथोत्सवातील उपस्थिती पाहून महापौरांनी आनंद व्यक्त केला आणि ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर राज्य भाषा संचालक  अरुण गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी  शशिकांत काकड, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह  रवींद्र गावडे आणि कार्याध्यक्ष शीतल करदेकर उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल मिताली तरळ, उमा नाबर, जयवंत गोलतकर, विनायक परब यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com