(2021-22 साली होणार होती ती जात-जनगणना आता मे 2026 मध्ये होणार आहे. 2021 साली भारतीय बौद्ध महासभेने आपलं धम्मयान या कॅलेंडर मधील प्रत्येक पानावर खाली तळटीप टाकून प्रत्येक धर्मांतरित बौद्धाने जात जनगणनेच्या फॉर्म मध्ये धर्माच्या रकान्यात 'धर्म-बौद्ध' व जातीच्या रकान्यात जात-महार/मांग/चांभार/ढोर असं लिहिण्याचा अजब अन मेंदू बधिर करणारा आदेश काढला होता... भारतातील बौद्ध धम्माचं संवर्धन करण्यासाठी बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचं हे काम खचितच नव्हे... आता पुन्हा भारतीय बौद्ध महासभेने तोच पराक्रम 3 मार्च 2026 रोजी एक पत्रक काढून केलाय .._ _रमाबाईनगरातील गंधकुटी (भाजपा शरण दलितांच्या ताब्यात असलेलं बुद्धविहार कम लग्नाचा हॉल) याचं RSS ने केलेला भारतीय बौद्ध महासभेच्या पाहुणचारात केलेलं जीर्णोध्दार... रमाईच्या पुतळ्याच्या RSS/भाजपा आमदार/महापौर यांच्या हस्ते, प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेने केलेलं, लोकांना अंधारात ठेवता, केलेलं लोकार्पण हे निश्चितपणे दाखवतंय की भारतीय बौद्ध महासभेने कोणती वाट धरलीय हे दाखवत आहेच..त्यात भर पडलीय ती आरक्षणाचं पोटार्थी बनलेल्या टिपिकल महार-बौद्ध मध्यमवर्गीयांची...
सरकारी शाळा धडाधड बंद पडल्या गेल्या.. सरकारी कंपन्याचं सर्रास खाजगीकरण झालं..आरक्षण संपुष्टात आलं मात्र या मंडळींनी कधी त्याविरोधात संघर्ष केला नाही.. आता मात्र जनगणनेत जात नाही लिहिली तर आरक्षणाची टक्केवारी कमी होईल असा घोर यांना लागलाय कारण टक्केवारी कमी झाली तर आपल्या पोरांचं..त्यांच्या पोरांचं..त्यांच्या पोरांच्या पोरांचं काय होणार या काळजीनं यांची झोप उडालीय त्यामुळं बौद्ध धम्माची 'काशी' झाली तरी चालेल मात्र आमचं आरक्षण तेवढं शाबूत राहिलं पाहिजे अशी आंबेडकर विचार द्रोही भूमिका यांनी जाहीर घेतलीय... तसंच प्रत्येक दलित-आदिवासी हत्याकांड, अन्याय-अत्याचार प्रकरणी स्वतःला दोन हात लांब ठेवणारी (काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता) ही मंडळी, जनगणनेत 'धर्म - बौद्ध' अन 'जात - महार' न लिहिल्यास Prevention of Atrocities (SC/ST), Act 1989 हा रद्द होईल असा बिनबुडाचा तर्क लावून गळा काढू लागलेत.. उद्देश्य एकच आपल्या पोरांचं..त्यांच्या पोरांचं...त्यांच्या पोरांच्या पोरांचं आरक्षण सुरू रहावं.. बस्स.._बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला उधळून टाकण्याचा डाव रचणारी भारतीय बौद्ध महासभा अन हे शिकलेले महार-बौद्ध लफंगे यांच्यापासून समाजाला सावध करण्यासाठी, बाबासाहेबांचे 'धर्मांतर अन आरक्षण' याबाबत स्पष्ट मतं काय होती हा 2021 साली लिहिलेला लेख पुन्हा पाठवत आहे... याचसाठी की बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे असतील तर जात-जनगणनेत *'धर्म -बौद्ध* व *जात-नाही'* अशी ठळक नोंद करावी व तसा प्रचार-प्रसार व्हावा).
जातिभेद, अस्पृश्यता व धर्मांतर बद्दल बाबासाहेबांचे बोल :
*1929, (बहिष्कृत भारत)* _"लेनिन हिंदुस्थानात जन्मला असता तर प्रथम त्याने जातिभेद व अस्पृश्यता यांना साफ गाडून टाकलें असतें व तसें केल्याखेरीज क्रांतीची कल्पना त्यानें मनातही आणली नसती."_
*1935 (येवला)* _"दुर्देवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेवून मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि, हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच शंका नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही."_
*1936 (मुक्ती कोण पथे?, अखिल मुंबई इलाखा महार परिषद, दादर)* _"आम्ही हिंदू समाजात हीन गणलो गेलो आहोत, इतकेच नव्हे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थानदेशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणलो गेलो आहोत. ही अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता, हा कलंक धुवून टाकण्याकरिता...जर कोणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदू धर्माचा व हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय..."_ _"वरिष्ठ जातीतील धर्मांतरविरोधी लोकांनी तुम्ही धर्मांतर केले तर तुमच्या महारक्या जातील, अशी भीती गावोगावी महार लोकांना घातल्याचे माझ्या कानी आले आहे. महारकी गेली तर मला स्वतःला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही...महारांना अधोगतीस नेणारी जर कोणती एखादी बाब असेल तर ती महारकी होय."_
*1936 (अखिल मुंबई इलाखा मातंग परिषद, दादर)* _"महारांना जातीचा अभिमान बाळगावयाचा नाही किंवा आपल्या जातीचे महत्व त्यांना वाढवावयाचे नाही. त्यांना जातीभेद मोडून टाकावयाचा आहे आणि सर्व अस्पृश्य जातीचा एक समाज करावयाचा आहे."_
*1936 (Annihilation of Caste)* _"कुठल्या ही दिशेला वळा जातीचा राक्षस आडवा येणारच..त्याला गाडल्या शिवाय राजकीय प्रगती शक्य नाही, आर्थिक प्रगती शक्य नाही..."_
_"हिंदू समाज हा जातींचा संचय आहे..."_ (जाती तोडण्यासाठी) _"तुम्हाला तीच भूमिका घ्यावी लागेल जी बुद्धाने घेतली...तुमच्यात हिंमत हवी की तुम्ही हिंदूना सांगाल त्यांचा धर्म चुकीचा आहे - तोच धर्म ज्याने त्यांच्यात जातीबद्दल पावित्र्य निर्माण केलय..."_
_"जात निःसंशयपणे हिंदूंचा श्वास आहे. परंतु हिंदूनी सर्व वातावरण प्रदूषित केलय व शीख, मुसलमान, ख्रिश्चन सर्वांना बाधित केलय..."_
*1948 (अस्पृश्य : ते कोण होते व ते अस्पृश्य का झाले ?)*(ब्राह्मण विरुद्ध बौद्ध संघर्षात) _"बौद्ध असलेल्या विस्थापित (दुभंगलेल्या) लोकांनी गोमांस खाण्याची सवय चालू ठेवली, व अस्पृश्यता निर्माण होण्याचे हे प्रमुख कारण ठरले..."_
*8-5-1955 (नरे पार्क, मुंबई, 'जनता' )* _"बुद्ध धर्म व हिंदू धर्म यात जमीन अस्मानाचं अंतर आहे...हिंदू चातुर्वर्ण्य मानतात ; पण बुद्ध धर्मात चातुर्वर्ण्य व जातिभेद नाही...जातीभेदाने अपरिमित नुकसान झाले आहे. जातीभेद नष्ट करा !"_
*18-3-1956 (आग्रा, 'प्रबुद्ध भारत')*_"दुसर्या कोणत्याही धर्मापेक्षा बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. माझी इच्छा आहे की, तुम्ही सर्वानी माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा यावर्षी स्वीकार करावा.मी याबाबतीत तुमच्यावर सक्ती करणार नाही. हा तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. परंतु माझ्या बौद्ध धर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. आपण सर्व बौद्ध झाल्यानंतर राखीव जागेचे अधिकार राहणार नाही."_
*1956 ('प्रबुद्ध भारत')* _"मी जे धर्मांतराचे कार्य आरंभिले ते नीट समजवून घ्या ; त्याचे महत्त्व पारखून घ्या व काय करायचे ते ठरवा, मात्र ते ठरल्यावर जुने ते टाकून द्या..."_
*1956 (दिल्ली)* _"जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याने ...लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहे...भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिले तर हे शिक्षण जातीव्यवस्थेला विरघळून टाकेल...त्यांच्या सद्यपरिस्थितीतील अज्ञानामुळे, ते जातीव्यवस्थेचे समर्थक बनलेले आहेत. एकदा त्यांचे डोळे उघडले तर ते जातीव्यवस्था नष्ट करण्यास उद्युक्त होतील..."_
*13-10-1956 (पत्रकार परिषद, नागपूर, 'प्रबुद्ध भारत')* _"घटनेने दिलेल्या खास सवलतींचा लाभ उठविता यावा म्हणून आम्ही सदासर्वकाळ अस्पृश्यच रहावें, असे तुम्हाला वाटते काय ? आम्ही मनुष्यत्व गांठण्याचा प्रयत्न करत आहोंत घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का ?"_
*14-10-1956 (नागपूर, 'प्रबुद्ध भारत')* _"काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येवून म्हणाला " पार्लमेंट, असेंब्ल्या मध्यें तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता ? " मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्या मध्यें भरा....राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाहीं ?आमचे नुकसान झालें तर तुम्ही रडता का असा माझा त्यांना सवाल आहे...मनुष्यमात्राला, इज्जत प्यारी असतें; लाभ प्यारा नसतो..."_
_"...महार बौद्ध म्हणून हिणवू नका..."_ *15-10-1956 (श्याम हाॅटेल, नागपूर)* _"राखीव जागा नकोत, म्हणून फेडरेशननें ठराव केला आहे. त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासून ढळण्याची माझी इच्छा नाही..."_
वरील अति - संक्षिप्त विचारांतूनही बाबासाहेबांची जातीभेदाविषयी तळमळ, जाती नष्ट करण्यासाठी त्यांची धडपड आणि जातीविरहीत समाज निर्मितीसाठी त्यांनी धरलेली बौद्ध धम्माची कास अत्यंत स्पष्टपणे दिसून येते.
बौद्ध झाल्यामुळे घटनात्मक आरक्षण संपुष्टात आले तरी हरकत नाही मात्र आरक्षणासाठी सदासर्वकाळ अस्पृश्य बनून रहाणे बाबासाहेबांनी स्पष्टपणे नाकारले. बौद्ध झाल्यानंतर येणार्या अडचणी कशा टाळता येतील त्याचा त्यांनी पूर्ण विचार केला आहे हे सांगतानाच त्यांच्या पोतडीत सर्व कांही भरलेलें आहे....गेलेले हक्क ते पुन्हा मिळवून देतीलच याची ग्वाही ही बाबासाहेबांनी दिली मात्र गेलेले हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य बनून राहण्यास त्यांनी कधीच मान्यता दिली नाही. बौद्ध धर्म घेतल्यानंतर ते अस्पृश्य राहणार नाही हे बाबासाहेबांनी अगदी स्पष्टपणे नमूद केले.मात्र, काही लफंगे जनगणनेच्या निमित्तानं आरक्षणाची झुल पुढे करून बौद्ध धम्मात जाती घुसडू पाहताहेत. यात नागपुरातील उमेश गजभिये 'महार' अन मुंबईतील अच्युत भोईटे 'चांभार' या दोहोंनी बाबासाहेबांचे धर्मांतराद्वारे जातीअंत हे स्वप्न धुळीस मिळविण्याचा चंगच बांधलाय.
धर्मांतराची हेटाळणी करणाऱ्यांना बाबासाहेबांनी, " (धर्मांतरीतांना) _महार बौद्ध म्हणून हिणवू नका"_ असा सज्जड दम दिला तर हे लफंगे स्वतःला 'महार-बौद्ध', 'चांभार-बौद्ध' म्हणवून मिरवण्यात धन्यता म्हणताहेत. बाबासाहेबांनी जातींना 'गुलामगिरीच्या बेड्या' मानले तर हे महाशय जातींना गळ्यातील आभूषण भूषवू पाहताहेत.ज्या व्यक्ति पूजेला बाबासाहेबांनी सदैव कट्टरपणे विरोध केला व त्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला त्या व्यक्ति पूजेने बरबटलेल्या किंबहुना आकंठ बुडालेल्या समाजात 'आंबेडकरी घराण्याला' आयतं फावलं नसतं तर नवलच.त्यामुळेच बौद्ध महासभेवाल्यांना ('आंबेडकर' नाव लागले असल्यामुळे) एखाद्या विषयाची समाजाला फोड करून सांगावी याची गरज भासत नाही...आदेश काढला की ते मोकळे.
सदर प्रसंगीही त्यांनी त्यांच्या 'धम्मयान' दिनदर्शिका २०२१ मध्ये प्रत्येक पानावर एक तळटीप टाकून 'जनगणनेमध्ये बौद्ध व्यक्तीने धर्म - *बौद्ध* व जात - 'महार, मांग, चांभार' इत्यादी लिहावी' असा फतवा जाहीर करून टाकला. असे केल्याने आपण बाबासाहेबांच्या विरोधात वर्तन करत आहोत याचे भान राखण्याचीही त्यांना तशी गरज वाटली नाही. बरं, हा फतवा काढण्याआधी भा.बौद्ध.महासभेने किमान हा तरी विचार करायचा होता की त्यांनी खरंच किती 'मांग' व 'चांभार' यांना 'बौद्ध' केलय जेणेकरून हा फतवा त्यांना लागु होइल. स्वजातीय महारांचे सोडा त्यांचे काय त्यांनी तर जन्मत:च 'बौद्ध' असण्याचे पेटंट मिळवलय जणू. बौद्ध झाल्याने जे हक्क गेलेत ते पुन्हा मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांच्या पोतडीत काय उपाय होते हे शोधण्याऐवजी भारतीय बौद्ध महासभेने म्हणजेच आंबेडकरी घराण्याने आरक्षणासाठी अस्पृश्य जातीत राहण्याचा 'जातीयवादी' मार्ग पत्करला ही शोकांतिकाच.
जातीव्यवस्था ही हिंदू धर्माची देन असली तरी या व्यवस्थेने मुसलमान व ख्रिश्चन धर्मांना ही आपल्या कवेत घेतलय हे ही बाबासाहेबांनी स्पष्ट करतानाच एका पत्रकाराच्या, _*" बौद्धधर्म स्वीकारानंतर अस्पृश्य वर्गात जातिभेद रहाणार नाही हे कशावरून ?"*_ या खोचक प्रश्नाला अत्यंत बोधक उत्तर दिले, _*" तो (जातिभेद ) आम्ही तुमच्या कडूनच घेतला ना ? पण त्यास आम्ही प्रतिरोध तर करूं शकतो. मी शूर आणि धीट आहे. मी लोकांना कसें वागावे, याचे आदेश देईन नाहीं तर एकटाच बुद्ध होईन त्यांत बिघडले कोठे ?"*_ (प्रबुद्ध भारत, दीक्षा विशेषांक).
बौद्ध झाल्यावर 'जाती' सोडा हा बाबासाहेबांचा आदेश जर लोकांना मानायचा नसेल तर ते एकटेच बौद्ध होतील अशी उघड अन टोकाची भूमिका बाबासाहेबांच्या या उत्तरात दिसतेय. धर्म 'बौद्ध' व जात 'अस्पृश्य' लिहिण्याचा निर्लज्जपणे प्रचार करत हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेची घाण बौद्ध धम्मात आणू पहाणार्या लफंग्यांच्या डोळ्यांसाठी हे नक्किच अंजन ठरावं. असो. जनगणनेत धर्म - 'बौद्ध' व जात - 'महार/चांभार/मांग' इत्यादी लिहिण्यास बाध्य करण्यासाठी ही लफंगी मंडळी दोन प्रकारचे तर्क लावताहेत
*पहिला तर्क:* 2021-22 च्या जनगणनेत जर बौद्धांनी आपली पूर्वाश्रमीची हिंदू जात नाही लिहिली तर दलितांची संख्या कमी भरेल व त्यामुळे : 1) दलितां साठी असलेला शासकीय निधी कमी होईल. 2) दलित आरक्षणाची टक्केवारी कमी होईल. 3) 'प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रोसिटी ॲक्ट' (दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायदा) संपुष्टात येईल. खरंतर, महाराष्ट्रातील काही मोजक्या 'शहरातील' मोजक्या बौद्धांनी आपली पूर्वाश्रमीची 'महार' जात लिहिण्यास नकार देण्याने अखिल भारतीय दलितांच्या संख्येत मोठा फेरफार होईल असे मानणे हेच अगदी हास्यास्पद आहे. तरीही सर्वसामान्यांना भुलविण्यासाठी जी कारणे दिली जाताहेत त्याची पोलखोल आवश्यक आहे.
1) *दलितांसाठी सरकारी निधी* गेली कित्येक वर्षे दलितांच्या कल्याणासाठी असलेला हजारों-करोडोंचा सरकारी निधी बेमालूमपणे इतरत्र वळविला जात आहे. दलितांच्या लोकसंख्येचा इथे काहीही संबंध नाही. सरकारमधील दलित पुढारी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर असल्यामुळे हे घडत आहे. दलितांची संख्या कमी असो वा जास्त जोपर्यंत मोक्याच्या जागेवर खऱ्या अर्थाने असलेला आंबेडकरी नेता पोहोचत नाही हे होत राहणार.
2) *दलित आरक्षणाची टक्केवारी* मुळात 2021-22 च्या जनगणनेची आकडेवारी चा वापर दलितांच्या आरक्षणातील टक्केवारी साठी होणारच नाहीये. संविधानाचे कलम 330 (सत्याएंशीवे विशोधन) नुसार जोपर्यंत साल 2026 नंतर पहिली जनगणना होत नाही तोपर्यंत साल 2001 चे आकडे आरक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे 2021-22 च्या जनगणनेत जर दलितांची संख्या कमी भरली तर आरक्षणाचे प्रमाण घटेल हे लफंग्यांचे म्हणने धादांत खोटे आहे.
3) *'प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रोसिटी ॲक्ट'* संविधानाच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट झाली असे जाहीर झाले असले तरी दलित-आदिवासींच्या नागरी हक्कांवर गदा येवू नये म्हणुन 1955 साली PCR Act (नागरी हक्क संरक्षण कायदा) अस्तित्वात आला. PCR Act 1955 अस्तित्वात असूनही दलित-आदिवासींवरील अन्याय-अत्याचार कमी होत नाहीत म्हणुन 1989 साली 'प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रोसिटी ॲक्ट' हा कायदा बनलाय. या कायद्याचा अन दलितांच्या लोकसंख्येचा दूर दूर चा ही संबंध नाही. अगदी झाडून सगळे महार शंभर टक्के बौद्ध झाले तरी हा कायदा संपुष्टात येणार नाही.
दलितांचा शासकीय निधी त्यांच्या उपयोगी पडत नाही. खासगीकरणा मुळे आरक्षण संपल्यात जमा आहे व दिवसाला शेकडो दलित अत्याचाराची प्रकरण राजरोसपणे घडत आहेत. मात्र, या विषयावर ही लफंगी मंडळी कधीच रस्त्यांवर दिसत नाही मात्र जनगणनेत बौद्धांनी जाती नाही लिहिल्यास या गोष्टी जातील म्हणून उरबडवेगीरी करताहेत यातच यांची लबाडी उघड होत आहे.
*दुसरा तर्क :* आपल्या पूर्वजांच्या जातीचा अभिमान बाळगण्यासाठी पूर्वाश्रमीची 'जात' लिहावी. यासाठी ही मंडळी बाबासाहेबांनी आपल्या पूर्वजांबद्दल गौरवोद्गार काढल्याचा दाखला देतात. निश्चितपणे बाबासाहेबांनी अनेकदा आपल्या महार पूर्वजांचा गौरव केलाय. ज्यात गैर असे काहीच नाही. मात्र, ते उदाहरण लोकांना देऊन जनगणनेत 'जात' लिहायला लावणे म्हणजे निव्वळ निर्लज्जपणा. प्रत्येक जातीला आपल्या जातीचा अभिमान असतो म्हणुन तर जात तुटत नाही..सुटत नाही म्हणुनच समजा गजभिये सारखे पूर्वाश्रमीचे महार, बौद्ध बनून ही 'महार' राहू लागले. अच्युत भोईटे हे बौद्ध होऊनही 'चांभार' राहू लागले. यांचे अनुकरण करून बौद्ध झालेले पूर्वाश्रमीचे 'मांग', 'कुणबी', 'सोनार', 'ब्राह्मण' इत्यादी आपआपल्या जातींना चिकटून राहिले तर जाती ग्रस्त, अन्यायी, स्वातंत्र्य-समता-बंधुता नाकारणारा हिंदू धर्म व त्याला मूठमाती देण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धम्म यात फरक तो काय राहणार ?
जातीव्यवस्था शाबूत राखणे ही हिंदू धर्माची अतोनात गरज आहे म्हणुनच RSS वाले जातीव्यवस्था मोडू देत नाहीत. तर, जातीव्यवस्था ही माणसाच्या प्रगतीत सर्वात मोठी धोंड आहे म्हणुन ती नष्ट करणे हे सर्वतोपरी कर्तव्य हे आंबेडकरी विचार होय. नागवंशीय बौद्धांच्या ब्राह्मणांसोबत संघर्षातून अस्पृश्य म्हणजेच 'महार', 'चांभार', 'मांग' इत्यादी निर्माण झाले असं बाबासाहेबांनी मांडले. या अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा मार्ग दाखवला अन आता बौद्ध झालेले हे लफंगे पुन्हा अस्पृश्य बनू पाहताहेत. म्हणूनच, RSS ला साजेशी खेळी करून बोधीसत्व बाबासाहेबांना पुनश्च 'महार' बनवत त्यांचे क्रांतिकारी जीवनकार्य मातीमोल करू पहाणार्या या लफंग्यांचा हा डाव हाणून पाडावाच लागेल...असं न करणं हे आंबेडकरी विचारांशी घोर प्रतारणाच ठरेल...
- मिलिंद शांताराम भवार ..._पँथर्स_ 9833830029
- 07 डिसेंबर 2021
- *पुनर्प्रसारित: 12 एप्रिल 2026*


0 टिप्पण्या