महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट होत असुन वाहन चालकांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध शासनाने तातडीने कारवाई न केल्यास या विरोधात वाहन चालक मालकासह उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा औल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश समुखराव यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. अशी माहिती समुखराव यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. असेही ते म्हणाले.गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले जाते अशा अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार राज्यामध्ये सोशल मिडीयावर आपण सर्व पहात आहोत. गाडी रिकामी असतानासुध्दा ऑनलाईन नाहक चलन टाकले जाते. राज्यातील शहरी भागामध्ये वाहतुक पोलिस शुल्लक कारणावरुन वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसुली करतअसल्याचा आरोप समुखराव यांनी केला.
महाराष्ट्र राज्य सरकारने वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर टोल नाक्याच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने लुटमार चालू आहे हे थांबविण्यासाठी राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवीन धोरण तयार करावे. वाहन चालकांच्या अपघाती मृत्यु पश्चात त्या परिवारास मदत म्हणून तात्काळ १० लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावे. राज्यातील सर्व महामार्गावर प्रती १०० किलोमीटर अंतरावर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह बनवावे. अशा मागण्यां शासनाकडे केल्या आहेत. याबाबत तात्काळ विचार न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समुखराव यांनी यावेळी दिला

0 टिप्पण्या