Top Post Ad

डीजेच्या मागे कोण..?

नुकताच देहूगाव येथे आणि त्या दोन दिवस आधी पिंपळे गुरव या ठिकाणी संयुक्त जयंती निमित्त कविसंमेलनाचे कार्यक्रम झाले. तसे तर या महिन्यात कार्यक्रम सुरूच आहेत. पण या दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजनातील काही ठळक मुद्दे महत्वाचे निदर्शनात आले. हे मुद्दे समाजासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत. या आयोजकांनी जे केलं त्याचे अनुकरण सर्वांनी करायला हरकत नाही.

१) पिंपळे गुरव...कैलास बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.राजाभाऊ भैलूमे, प्रा.किरण सुरवसे आणि डॉ.निशा भंडारे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यात उल्लेखनीय बाबा म्हणजे या मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये महिला कार्यकारिणीचा उल्लेख होता. बऱ्याच वेळा महिला सहभागी असतात पण फक्त कामासाठीच प्रत्यक्ष त्यांचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेवर नसतोच.

२) देहूगाव....VDBA ग्रुप (विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर) भव्य नियोजन एखादा बिग बजेट ऑक्रेष्ट्राचा स्टेज असावा अशी सगळी व्यवस्था. देहूगावच्या कमानीसमोर मेन बसस्टॉपजवळ इंद्रायणीच्या काठाला हे नियोजन.रोडच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे भव्य प्लेक्स, पण त्यावर फक्त बाबासाहेब आणि त्याच्या संदेशाचे मजकूर. स्टेजवर किंवा कुठेही अन्यत्र कोणत्याही नेत्याच्या कार्यकर्त्याचा फोटो नाही की कोणी अध्यक्ष नाही की कोणी पदाधिकारी नाही.फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रबिंदू मानून सर्व काम सुरू होतं. पुण्याच्या उपनगरांमधील राजकीय वातावरण पाहता हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.

विशेष म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊन छपरी चाळे करत फिरणाऱ्या तरुणाईच्या काळात इथली नुकतीच मिसरूड फुटलेली तरुण पोरं कारभारी होती व जबाबदारीने वागत होती. याचे कारण असे की त्यांच्या मागे अनुभवी वयस्कर मंडळी ठामपणे उभे राहून मार्गदर्शन करत होती. जुन्या लोकांनी खुर्च्या सोडून नवीन नेतृत्वावर विश्वास ठेवल्याच आदर्श उदाहरण.

विशेष बाब म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात कुठेच दारू पिऊन डांगडींग करणारा एकही कार्यकर्ता निदर्शनात आला नाही की स्टेजवर येणासाठी धडपड करणारा भपकेबाज माणूस दिसला नाही. 

आदर्श असावी अशी जयंती...अशा आदर्श जयंती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत आहेत. पण ज्या जयंती मंडळांना भांडवलदार, बिल्डर्स, नेते आणि व्यापारी पॉन्सर आहेत तिथेच प्रबोधन सोडून नाचगाणी डीजे आहेत. आणि हे भांडवलदार पॉन्सर का आहेत याच कारण शोधलं तर असं लक्षात येईल की जयंती मंडळातले काही तरुण कार्यकर्ते हे त्याचे पंटर आहेत. जुन्या जाणत्या लोकांची हीच पंचायत झालीय की तुमच्याकडे पैसा नाही गप्प बसा आम्ही करतो जयंती साजरी. तुमचा वक्ता 50 हजार मागतोय देऊ शकता का.? त्यापेक्षा 50 मध्ये बाई नाचेल आणि गर्दी जमा होईल.

धिंगाणा झाला पाहिजे...धिंगाणा....हाच काय तर मुख्य मुद्दा. बाकी कोणताही आंबेडकरी कार्यकर्ता जाणीवपूर्वक जयंतीचे विद्रुपीकरण करणार नाही किंवा होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात या सतरंजीबाज नकली कार्यकर्त्यांना रोखलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, की जयंती आमच्या बापाची आहे. तुझ्या राजकीय बापाच्या जयंतीला आपण धिंगाणा करू.

जयंती सोहळा साधा झाला तरी चालेल पण विचारांनी श्रीमंत असला पाहिजे.मोठमोठी लायटिंग नसूद्यात पण महापुरुषांच्या कार्याचा प्रकाश घराघरात पोहचला पाहिजे.डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा बुद्धाच्या शांततेच्या मार्गावरील प्रसन्नता खूप खूप प्रभावी आहे याची जाणीव होणे काळाची गरज आहे.वाजलं पाहिजे, नाचलं पाहिजे, जल्लोष तर झालाच पाहिजे पण मानवी संवेदना लक्षात घेऊन. आपल्याला माणूस म्हणून मान्यता मिळण्यासाठी खूप मोठा संघर्ष झालाय म्हणून आपण माणूस आहोत हे विसरता कामा नये.

तसही डीजेचा आवाज मोठा असूद्यात नाहीतर नसूद्यात ज्यांच्या कानाला त्रास व्हायचा आहे तो होणारच आहे. काहींच्या कानाचा नाही संकुचित मनाचा प्रॉब्लेम आहे.आपण त्यांचा विचार न करता जयंती साजरी करताना फक्त एक लक्षात ठेवले पाहिजे सध्याचे वातावरण पाहता जल्लोषात बेहोश होण्याचे दिवस नाहीत, तर होशमध्ये जागृत राहून डॉ.आंबेडकरांचे विचार पूढे नेण्याची आणि भांडवलदारांच्या(पॉन्सर) विळख्यात अडकलेली जयंती सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. 

14 एप्रिलच नाहीतर वर्षभर प्रबोधनाचे कार्यक्रम व्हावेत. वाटल्यास अव्यवहारिक आकडा मागणाऱ्यांना फाटा द्या आपल्याकडे बोलणारे खूप लोकं आहेत शोध घ्या सापडतील. काहीही झालं तरी जागृतीचा विस्तव तेवत राहिला पाहिजे.कारण 14 एप्रिल फक्त डॉ.बाबासाहेबांची जयंती नाही तर हा हजारों पिढ्यांचा स्वातंत्रदिन आहे.

~ सुमित गुणवंत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com