पत्रकारांचा चायवाला असे बिरूद गेली पाच दशके अभिमानाने मिरवणार्या दादर रेल्वे स्थानकाजवळील चहाच्या साध्या टपरीचे मालक बबनशेठ केमकर यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘अमृततुल्य’ सत्कार माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आला. दादर रेल्वेस्टेशनला खेटून असलेल्या फुटपाथवरून सुरू झालेल्या ‘बबनशेठ चहावाल्या’च्या प्रवासाने अनेक पत्रकार, कलाकार आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात तरतरी आणत आपलेपणा आणि आठवणींचा ठेवा निर्माण केला. अशा ‘पत्रकारांचा चहावाला’ ‘बबनशेठ’च्या पंच्याहत्तरीनिमित्त २७ एप्रिल रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि बबशेठ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक चाय बबनसोबत’ या कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बबनशेटवरील विशेष लेखांच्या संग्रहाचे प्रकाशन कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात चाय पे चर्चा अर्थात एका भव्य सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार कपिल पाटील, खजिनदार जगदीश भुवड, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, कार्यक्रमाचे समन्वयक गजानन दुधलकर, विश्वस्त राही भिडे आणि अजय वैद्य उपस्थित होते. प्रभाकर वाईरकर यांनी तयार केलेले व्यंगचित्र बबनशेठ यांना यावेळी भेट देण्यात आले
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी बोलताना पत्रकारितेतील बदलांचा आढावा घेत जुन्या काळातील टाइपरायटर, कार्बन पेपर आणि चहाच्या टपरीभोवती रंगणार्या चर्चांची आठवण जागवली. ‘त्या काळातील पत्रकारितेची संस्कृती वेगळी होती आणि केमकर यांचा सत्कार हा त्या संस्कृतीचा सन्मान आहे,’ बबनशेठ हे त्या काळातील आर्थिक स्थित्यंतराचेही एक साक्षीदार आहेत, असे केतकर यावेळी म्हणाले.
माजी आमदार कपिल पाटील यांनी ‘मुंबईचा फूटपाथ हा गरीब माणसाचा आहे’ असे सांगत अशा टपर्यांचे अस्तित्व टिकवण्याची गरज अधोरेखित केली. ‘फूटपाथ रिकामा झाला तर या माणसांचे काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित करत बबनशेठ यांच्या कार्याचे कौतुक केले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, ‘चहाच्या टपरीभोवती निर्माण झालेल्या नात्यांमुळे अनेक पिढ्या जोडल्या गेल्या आहेत. बबनशेठ हे केवळ चहावाले नसून पत्रकारांचे मित्र, मार्गदर्शक आणि आधारवड होते.’
बबनशेठ म्हणजे केवळ चहा विकणारा माणूस नव्हे, तर दादरच्या पत्रकारविश्वाचा अविभाज्य भाग. त्यांच्या चहाच्या टपरीवर अनेक पत्रकारांच्या गाठीभेटी रंगत, चर्चांना उधाण येत असे. ‘चाय पे चर्चा’ ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनी नकळत रुजवली होती, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या चहाच्या कपातून फक्त चव नव्हे, तर माणुसकीचा गोडवा मिळत असे, अशी भावना बबनशेठ मित्रमंडळाचे समन्वयक गजानन दुधलकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ‘बबनशेठ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात अंबरीश मिश्र, संजीव साबडे, मीना कर्णिक, सुकन्या मोने, संदीप चव्हाण, शैलेंद्र शिर्के, गजानन दुधलकर, समीर परांजपे यांसह अनेक मान्यवरांनी आपल्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदीप म्हापसेकर यांनी केले आहे. कार्यक्रमाचा समन्वय ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन दुधलकर यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना बबनशेठ केमकर भावूक झाले. ‘फूटपाथवरून या मंचापर्यंत आलो तो तुमच्यामुळेच. रस्त्यावरच्या माणसाला इतके प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे,’ असे त्यांनी नम्रपणे सांगितले. त्यांच्या या शब्दांनी सभागृह काही क्षण स्तब्ध झाले.चहाच्या कपाभोवती घडलेली नाती, मैत्री आणि पत्रकारितेचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा उजाळला गेला.
दादर स्थानकाबाहेरील त्यांच्या टपरीवर पत्रकार, नाट्यकर्मी, कलाकार, कामगार, राजकारणी अशा विविध क्षेत्रांतील लोकांची वर्दळ असायची. त्यांच्या चहाच्या कपाभोवती अनेक बातम्यांचे बीज रुजले, अनेक स्नेहबंध जुळले आणि असंख्य आठवणी दरवळल्या. त्यांच्या सहवासात राहिलेल्या पत्रकार, कलाकार आणि मित्रपरिवाराच्या आठवणींना ताजा करणारा हा कार्यक्रम ठरला. एक चाय बबनसोबत’ हा कार्यक्रम .मुंबईतील पत्रकारांसाठी आणि बबनशेठच्या चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरला.


0 टिप्पण्या