मुंबई शहरातील विविध मंदिरांसमोर पूजेसाठी ठेवण्यात येणाऱ्या गोमातांवर पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या गोसेविका महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आली असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांनी केली. याबाबत अधिक माहिती देण्याकरिता आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक गोसेविकासह भटक्या व विमुक्त जाती संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे, अध्यक्षा कल्पना चव्हाण, किशोर शिंदे, सुरेश साळुंखे, सौ. नंदा शिंदे, रेखा शिंदे, दयानंद शिंदे आदी उपस्थित होते.
या गाईंमुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. तसेच रस्त्यावर मोकाट जनावरांना बंदी असल्याचे कारण देत पोलिस प्रशासन यावर कारवाई करीत आहे. मात्र ही कारवाई काही ठराविक परिसरातच का असा प्रश्नही भोसले यांनी उपस्थित केला. गाईमुळे परिसरात अस्वच्छता कशी निर्माण होऊ शकते कारण गाईचे गोमूत्र हे सर्वात पवित्र आणि शेण देखील बहु-उपयोगी आहे. हे आयुर्वेदात स्पष्ट केले आहे. हिंदू धर्मात गाईला पवित्र स्थान आहे. मंदिर परिसरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गाईंवर कारवाई करणे दुर्दैवी आहे. शासनाने या धार्मिक परंपरेचा विचार करून मंदिर परिसरातील गाईंना कायदेशीर संरक्षण द्यावे, संपूर्ण दिवसभर बसण्याची परवानगी आम्ही मागत नाही तर सकाळच्या वेळी केवळ चार तास बसण्याची तरी परवानगी शासनाने द्यावी. या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून गोसेविका महिलांना न्याय द्यावा ” अशी मागणी मच्छिंद्र भोसले यांनी केली.

0 टिप्पण्या