Top Post Ad

आमदार संजय गायकवाड याला अटक करा... मागणीसाठी मंगळवारी मुंबईत निदर्शने

प्रशांत आंबी यांना अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या, आमदार संजय गायकवाड याला अटक करा! या मागणीकरिता महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष आणि पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांचे मंगळवार दि. २८ एप्रिल २०२६, सायंकाळी ४.३० वाजता. रोजी  छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, शिवाजी पार्क, दादर, मुंबई. येथे तीव्र निषेध निदर्शने करण्यात येणार आहेत. या निषेध निदर्शनाच्या कार्यक्रमात, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष आणि पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


स्वराज्य संस्थापक,कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी ओळख विषद करणारे *शिवाजी कोण होता?* हे पुस्तक कॉ. गोविंद पानसरे यांनी ४० वर्षापूर्वी मराठीत लिहिले असून, आजमितीपर्यंत भारतातील अनेक भाषांत ते भाषांतरित होऊन प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. देशातील दिग्गज विद्वान, अभ्यासक आणि चळवळीतील जाणत्या कार्यकर्त्यांनी हे पुस्तक वाचले/अभ्यासले असून हे पुस्तक शिवाजी महाराजांची खरी ओळख विषद करते,  असा स्पष्ट निर्वाळा देताना ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचले पाहिजे, अशी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त दिवंगत न्यायाधीश पी.बी. सावंत यांची पत्ररूपी प्रतिक्रिया तर या पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध केली आहे

सदरचे पुस्तक न वाचता केवळ त्याचे शीर्षक पाहून पुस्तकाचे कोल्हापुरस्थित कार्यकर्ते प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड याने, आई बहिणींचा उद्धार करणारी अर्वाच्च शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली, ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्य असून, आमदार संजय गायकवाड याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून, अटक करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष आणि पुरोगामी समविचारी पक्ष संघटना करीत आहेत,  संजय गायकवाड याचा निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केले आहे.

चुकीच्या पद्धतीने का होईना, संजय गायकवाड यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला, हात घालून राज्यात पुन्हा एकदा “शिवाजी कोण होता?” या विषयावर चर्चा सुरू करून दिली. त्याच बरोबर “लोकप्रतिनीधी कसा नसावा” यावरही चर्चा सुरु करुन दिली. खरं तर, या विषयाची चर्चा नव्या पिढीत होणं अत्यंत गरजेचं होतं. कॉ. गोविंद पानसरे यांचं “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक 1987 साली प्रकाशित झालं. म्हणजे आज जवळपास 39 वर्षांनंतरही पुस्तक न वाचता हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं. मागच्याच आठवड्यात माझी मुलगी अहिल्यासोबत गप्पा मारताना तिने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला- “बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?” यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे.
16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचं निधन झालं. नेमके त्याच काळात 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती, पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही नगर शहरात “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सुमारे 10,000 प्रती वाटून प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता… ती आठवण आज पुन्हा ताजी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करताना बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेत एक समावेशक स्वराज्य उभारलं. स्वराज्य म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवादी विचारच होता ज्यात राजाने जनतेला लुटून ऐश- आराम करण्यापेक्षा रयतेला केंद्रबिंदू ठेवून राज्यकारभार करणे होय. आज महाराष्ट्र ज्या उंचीवर उभा आहे, त्यामागे हाच विचार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. म्हणूनच, ही चर्चा केवळ वादासाठी नव्हे, तर योग्य समज, अभ्यास आणि पुढील पिढीला दिशा देण्यासाठी व्हावी, हीच अपेक्षा.
संजय गायकवाड यांचे फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे असे झाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'परस्त्रीला आई मानावे' हा दंडक घालून दिला होता. शिवाजी महाराज स्वराज्य आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही नेहमी आदर करत असत, त्यामुळे गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांमुळे महाराज कधीच माफ करणार नाहीत, हेही तितकेच खरे- Satyajeet Tambe


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com