Top Post Ad

मौलाना शौकत अली मार्गावरील फर्निचर विक्रेत्‍यांवर निष्कासनाची कारवाई

‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर विक्रेत्‍यांवर तसेच इतर अतिक्रमणांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून नुकतीच निष्कासनाची कारवाई करण्यात आली. उपायुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त श्री. आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

 ‘ई’ विभागातील मौलाना शौकत अली मार्गावर  विशेषत: मुरली देवरा नेत्र  रूग्‍णालयापासून ते जे. जे. रुग्णालय सिग्नलपर्यंतच्‍या परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचा-यांना चालताना अडथळा निर्माण होत होता. पादचा-यांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागातील परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन पथकांनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने संयुक्तपणे मोहीम राबवली.

या निष्कासन कारवाईदरम्यान फर्निचर विक्रेत्यांवर धडक व कठोर कारवाई करण्यात आली. पदपथांवर अस्ताव्यस्त पसरलेले जुने फर्निचर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर तोडलेल्या फर्निचरांचा कचरा तात्काळ हटविण्यात आला. पदपथावरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात आली. तसेच परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

या मोहिमेत १ जेसीबी, ४ मजूर, ३ अधिकारी आणि २ अभियंते सहभागी होते. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्याचे ९ अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com