'क्रेडाई-एमसीएचआय 'तर्फे बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊंटीमध्ये सुरू असलेल्या २३ व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा आज समारोप झाला. गेल्या तीन दिवसांत प्रदर्शनाला ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा व मुंबई उपनगरातील २० हजार ४६७ नागरिकांनी भेट दिली असून, २३४ नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात ३९८ कोटी रुपयांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
या प्रदर्शनात ठाण्यातील ४० हून अधिक आघाडीच्या विकसकांचे १०० हून अधिक रेरा-मान्यताप्राप्त गृह प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात ५५ लाख रुपयांच्या १ बीएचकेपासून प्रीमियम दर्जाच्या ४ बीएचके प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी औत्सूक्य दाखविले. किमान ५५ लाख ते २ कोटी २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, यूनियन बँकेसह काही बँका व वित्तसंस्थांची दालने होती. त्यात अनेक ग्राहकांच्या कर्जपुरवठ्यावरील अर्जावर तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली.घरखरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. त्यासाठी प्रदर्शनातील विधी व वास्तूविषयक मार्गदर्शन करणाऱ्या दालनांचीही ग्राहकांना मदत झाली. तर शेकडो कुटुंबांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सुविधांची माहिती घेतली. या कुटुंबाकडून लवकरच घरखरेदी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील नियोजित ठाणे-बोरिवली बोगदा, मेट्रो, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला अनिवासी भारतीय व गुंतवणूकदारांकडूनही लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक निवासी घरे व व्यावसायिक मालमत्तांची विक्री ठाणे शहरात होते. ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असून, त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ठाणे शहरात उत्तम जीवनशैली आहे. त्यामुळे ठाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श शहर म्हणून उदयाला आले आहे, असा विश्वास व्यक्त करीत अध्यक्ष सचिन मिराणी यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्प व प्रॉपर्टी प्रदर्शनातील विश्वासार्ह विकसकांमुळे घरखरेदीला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली.प्रॉपर्टी प्रदर्शनात समावेश असलेले पारदर्शक गृहप्रकल्प, विविध सोयिस्कर पर्याय आणि कर्जपुरवठ्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया सचिव फैय्याज विराणी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या यशाबद्दल ग्राहकांबरोबरच विकसक आणि बँकेचे प्रतिनिधींचे आभारी असून, यापुढील काळातही 'क्रेडाई-एमसीएचआय'च्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असे ते म्हणाले.
ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरातील नागरिकांनीही प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही ग्राहकांचे ऋणी आहोत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घरखरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना नोंदणी, सवलती आणि घराचा अंतिम ताबा मिळेपर्यंत सहकार्य करण्यात येईल, असे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी सांगितले.
या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह ठाणे शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच प्रदर्शनाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच ठाणे शहराच्या विकासात 'क्रेडाई-एमसीएचआय'ने बजाविलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. या प्रदर्शनात महारेरा, पाणीबचत या विषयावरील परिसंवादही पार पडले. त्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
'क्रेडाई-एमसीएचआय'तर्फे बाळकूम येथील 'दोस्ती वेस्ट काऊंटी येथे २३ व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचा शेवटच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार संजय केळकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. मुंबईपेक्षा सर्वाधिक वेगाने ठाणे शहराचा विकास होत आहे. नवे प्रकल्प साकारले जात आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी व विकसक यांच्यासह नागरिकांनी शहराच्या समतोल विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. या वेळी अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, भावेश गांधी, महेश बोरकर, अमित दातार, इम्तेहान खान यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ठाणे शहराच्या विकासात 'क्रेडाई-एमसीएचआय'चे योगदान महत्त्वाचे आहे, असे कौतुक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केले. शहरात लवकरच सुरू होणाऱ्या मेट्रो, अंतर्गत मेट्रो आणि पाँड टॅक्सीमुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होईल, असे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.१९९७ मध्ये पहिल्यांदा कॅडबरी कंपनीमध्ये चेतन पारीख व मुकेश सावला यांच्या नेतृत्वाखाली प्रॉपर्टी प्रदर्शनाला सुरुवात झाली. गेल्या २३ वर्षांत प्रदर्शनाने नावलौकिक मिळविला. उत्तम व्यवस्थापन व विश्वासार्हतेमुळे प्रदर्शनाच्या लोकप्रियतेत वाढ झाली. सध्याचे अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी प्रदर्शनाला नवी उंची मिळवून दिली, याबद्दल मंत्री सरनाईक यांनी कौतुक केले.
प्रदर्शनात अमृता राव यांचे जलअभियान - क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणे शहरात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी अभिनेत्री अमृता राव यांनी सुरू केलेल्या 'जलहित में जारी' अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. ठाणे महापालिकेबरोबर समन्ययाने अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी 'क्रेडाई एमसीएचआय'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमृता राव यांनी केले. क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी आयोजित परिसंवादात अभिनेत्री अमृता राव यांची मुलाखत समाजसेवक आदित्य चौहान यांनी घेतली. त्यावेळी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
ठाणे शहरात रिअल इस्टेटचा वेगाने विकास होत आहे. आपणही ठाण्यातील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे, असे नमूद करीत ठाणे शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल 'क्रेडाई-एमसीएचआय'चे अध्यक्ष सचिन मिराणी यांचे अभिनंदन केले. यापुढील काळात पाणीबचत गरजेची आहे. त्यामुळे विकसकांनी नव्या प्रकल्पांबरोबरच जुन्या सोसायट्यांनीही पाणीबचतीसाठी पुढाकार घ्यावा. सर्वप्रथम प्रत्येक नवीन घरात प्रत्येक नळाला शॉवर असलेले टेंप बसवावेत. तसेच जुन्या सोसायट्यांनीही सोसायटीच्या मेंटेनन्समधून शॉवर बसविल्यास पाणीबचत होऊ शकेल. नव्या गृहसंकुलांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास टंचाईच्या काळात पावसाचे पाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध होईल, अशी सूचना अभिनेत्री अमृता राव यांनी केली. ठाणे महापालिकेच्या सहकार्याने अभियान राबविण्याचा विचार असून, आमदार निरंजन डावखरे यांच्या सहकार्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर महापालिका आयुक्तांना योजनेचा सविस्तर आराखडा देण्यात येईल, अशी माहिती अमृता राव यांनी दिली.

0 टिप्पण्या