Top Post Ad

मुंबईत प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; १३.६९ लाखांचा साठा जप्त, १६ जण अटकेत

अन्न व औषध प्रशासन (FDA) बृहन्मुंबई कार्यालयाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, मावा व तत्सम अन्नपदार्थांवर धडक कारवाई करत सुमारे १३ लाख ६९ हजार २९३ रुपयांचा साठा जप्त केला असून १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत जनतेला सुरक्षित व शुद्ध अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या १६ जुलै २०२५ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत मुंबईतील विविध भागात धडक कारवाया करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान १५ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. मालाड, कुर्ला, सांताक्रूझ, भांडुप, धारावी, मुलुंड, नळबाजार आणि बोरीवली परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत ९ गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ, सचिव धीरज कुमार, अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बृहन्मुंबईचे सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी केले आहे. तसेच अशा पदार्थांचे सेवन आरोग्यास अत्यंत घातक असल्याने नागरिकांनी या व्यसनापासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com