: सामाजिक क्षेत्र आणि माहितीपट निर्मितीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी घटना मुंबईत घडणार आहे. मुंबईतील कामगारवस्तीतील दहा महिलांनी केवळ स्मार्टफोनच्या साहाय्याने तयार केलेला ‘मस्त महिला मंडळी’ (कूल लेडीज क्लब) हा चित्रपट ऐतिहासिक रिगल सिनेमा येथे तब्बल बाराशेहून अधिक प्रेक्षकांसमोर मंगळवार २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रदर्शित होणार आहे.
मुंबईच्या एम-पूर्व विभागातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अंजुम शेख, दर्शना मायकर, गौरी राणे, कविता खोंमे, नाझनीन सिद्दीकी, रोहिणी कदम, रेहाना शेख, शीतल नवले, कविता घुगे आणि वैशाली माने यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. साध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून या महिलांनी स्वतःचे जीवन, संघर्ष आणि जगण्याचे वास्तव चित्रित केले असून, पडद्यावर स्वतःची ओळख कशी मांडायची हे त्यांनी स्वतःच ठरवले आहे. या सर्व महिला कोरो इंडिया (CORO India) या संस्थेशी संलग्न असून, संस्थेच्या 'राईट टू पी' अभियानाशी जोडलेल्या आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये गेली ३८ वर्षे ही संस्था समुदायाधारित कार्य करत आहे.
संस्थेच्या तळागाळातील ज्ञाननिर्मिती उपक्रमांच्या प्रमुख व कार्यकारी निर्माती सुप्रिया जाण म्हणाल्या, “आमच्या संस्थेच्या इतिहासातील हा मैलाचा दगड आहे. या समाजघटकांतील महिला स्वतः बनवलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन एका ऐतिहासिक चित्रपटगृहात करत आहेत. त्या येथे विषय म्हणून नव्हे, तर निर्माती म्हणून उभ्या राहणार आहेत.”
दोन वर्षांच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रक्रियेतून हा चित्रपट साकार झाला. या काळात डॉ. शिल्पा गुलाटी यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट दिग्दर्शिका असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. गुलाटी म्हणाल्या, “मुंबईत तयार झालेला हा चित्रपट पुन्हा मुंबईकरांसमोर आणण्यासाठी रिगल सिनेमासारखी जागा योग्य आहे. भारतात माहितीपटांच्या वितरणास अनेक अडचणी आहेत. त्या पार करण्याचा हा प्रयत्न आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर, अशा पद्धतीने माहितीपटाचे प्रदर्शन यापूर्वी झालेले नाही.” त्या या चित्रपटाच्या सह-दिग्दर्शिका आणि संपादकही आहेत.
या विशेष प्रदर्शनासाठी आतापर्यंत एक हजाराहून अधिक नोंदणी झाली असून, चित्रपटगृह हाऊसफुल्ल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. चित्रपट निर्मात्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या वस्त्यांतील नागरिक, शहरातील तळागाळातील नेते, विकास क्षेत्रातील प्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि मुंबईतील चित्रपटसृष्टीतील मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.,

0 टिप्पण्या