काही दिवसांपूर्वी विलास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात 20 जणांनी घुसखोरी केली असल्याचे जाहिर केल्याने मोठा वाद झाला होता. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून संग्राम भंडारे यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती. लवांडे यांनी ज्या 20 घुसखोरांची नावे जाहिर केली त्यातील एका महाराजावरच आता सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, ज्या महाराजांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता, त्यांच्यातीलच एका व्यक्तीवर एवढे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने लवांडे यांच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
7 एप्रिल 2026 रोजी पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात जणांनी संगनमताने पीडितेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, पीडितेचे घर त्यांच्या नावावर करण्यासाठी आरोपींनी सतत दबाव टाकला असून, घर विकून पैसे न दिल्यास सतत त्रास देण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित महिलेने 24 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्याम महाराज राठोड यांच्यासह अभिमन्यू आंधळे, नारायण खंदारे, राहुल सुरेश चोरडीया, कानीफनाथ घुले, युवराज खरमाटे आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील फिर्यादीत पीडित महिलेने आरोपींवर अत्यंत संतापजनक आणि अमानवीय आरोप केले आहेत. आरोपींनी केवळ 7 एप्रिल रोजीच नव्हे, तर गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी देखील पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला होता. या छळवणुकीचा कळस म्हणजे, आरोपींपैकी एकाने पीडितेने बनवलेल्या भाताच्या पातेल्यात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. घटनेच्या काही काळानंतर आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी गेले होते, मात्र तिने दरवाजा न उघडल्याने त्यांनी घराबाहेर उभे राहून तिला शिवीगाळ केली. तसेच पीडितेचे चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने तिची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली. सध्या दिघी पोलीस या सर्व आरोपांची गांभीर्याने दखल घेत असून प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
"महिलांच्या अब्रूवर हात टाकणारे व्यक्ती कधीही वारकरी असू शकत नाहीत," अशा प्रकारच्या गुंडांना राजाश्रय देऊन त्यांचे संरक्षण करायचे की त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायचा, हे आता सत्ताधाऱ्यांनीच ठरवावे. आमदार रोहित पवार
"माझ्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. लवांडे प्रकरणामुळे माझ्यावर आरोप करण्यात आलेत. म्हणून मला दोषी ठरवले जात आहेत. मी संन्यासी आहे... माझा कुठलाही दोष नाही. काही सुपारीबाझ पत्रकार, धर्मविरोधी लोक असुरी आनंद घेत आहेत. ते माझा फोटो वापरून बातम्या करत आहेत. त्यांना माझा इशारा आहे...त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. खोट्या बातम्या देणाऱ्यांवर ही कारवाई होईल. - श्याम महाराज

0 टिप्पण्या