जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 7 जून 2026 या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदानी इस्टेट परिसरातील जैवविविधता उद्यान येथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून नोंदणीकरिता http://forms.gle/AHfh9rASdCEa9NrQ7 या लिंकवर नोंदणी करावी असे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले आहे.
ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यासाठी इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाकडे 15 जून पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार 15 जुलै पर्यंत जागा व शाडू माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून दिली जाणार असून शेड, वीज व पाणी यांसारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उपलब्ध करून घ्यायच्या आहेत. तसेच शाडू माती ठामपाच्या महिला बचत गट तसेच हवा प्रदूषण प्रयोगशाळा, वर्तकनगर येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी जागेसाठी अर्ज केल्यास ते स्वत: मूर्तीकार असणे बंधनकारक असून तसे हमीपत्र त्यांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक साहित्य/ शाडू मातीने मूर्ती घडविणात्या मूर्तीकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत असा आशयाचा 3 बाय 5 फूट आकाराचा फलक लावणेही आवश्यक राहणार आहे. पर्यावरण पूरक साहित्य / शाडू मातीने मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना या वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर महानगरपालिकेने नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली जागा नवरात्रौत्सव संपेपर्यंत उपलब्ध राहणार असून त्यानंतर पुन्हा महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावी असे धोरण महानगरपालिकेने निश्चित केले आहे.

0 टिप्पण्या