प्रधानमंत्री मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने हिंदुस्थानातून गेलेले 4 जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो, म्हणून यावर इटलीने रोख लावली, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर हा माल इस्रायल गेला तर यातून जवळपास 17 हजार शेल्स बनवले जातील, ज्याचा वापर गाझा पट्टीवर केला जाईल. त्यामुळे इटली सरकारवर तेथील पोर्टमधील कामगार संघटनांनी दबाव आणून हे जहाजे रोखून धरले आहेत. हिंदुस्थानातून इस्रायलला हा मिलिटरी स्टील पोहचवले जातंय. इराणला ही गोष्ट समजल्यामुळे त्यांनी हिंदुस्थानला तेल देण्याचे कमी केले. ही गोष्ट जगाला कळू नये म्हणून पंतप्रधान मोदी इटलीला गेले आहेत. पंतप्रधान मोदीचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्यानंतर प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय.
भारताला जे क्रूड ऑइल यायला पाहिजे होतं, त्याचबरोबर लिक्विफाईड नॅचरल गॅस यायला पाहिजे होता. अमेरिका-इराण युद्ध चालू असताना ते व्यवस्थित येत होत. पण, युद्ध संपल्यावर आपल्याला या सर्वांचा तुटवडा दिसतोय. याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. ॲड. आंबेडकर म्हणाले, "इटली मध्ये दोन संघटना आहेत. एक Boycott, Divestment, and Sanctions (BDS) आणि NHB (No Harbour for Genocide) या दोन्हीही संघटना इस्राएलकडे कोणतेही शस्त्र, मिलिटरी ग्रेडेड जाऊ नये यासाठी लक्ष देतात. या दोन संघटनांच्या लक्षात आले आहे की, हिंदुस्थान मोठ्या प्रमाणात इस्राएलला मिलिटरी ग्रेडेड स्टील पाठवत आहे. ही पुरवठा करणारी कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, जालना, असे त्यांनी नमूद केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून चार जहाज सुद्धा गेले आहेत. त्यांना इटलीमध्ये पकडले आहे. इटली सरकार ते सोडत नाहीत. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून हे हिंदुस्थानला अत्यंत घातक आहे.
पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे ते लपवण्यासाठी जो देखावा केला की, मोदी हॉलंड, नॉर्वेमध्ये जाऊन मग येता येता इटलीमधून येणार. पण त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीमध्ये जायचे होते. यामागे दोन मुद्दे होते, त्यापैकी एक म्हणजे ज्या बोटी पकडण्यात आले आहेत, त्या सोडविणे आणि दुसरं, याच एका लक्ष्मी कंपनीच्यासह कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं केमिकल तयार केले आहे. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली आणि ही कंपनी उभी करणाऱ्या सर्व मालकांना जेल झाली आहे. ही फॅक्टरी लक्ष्मी कंपनीने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभी करत आहेत. या केसची कोर्टाचे पेपर मिळू नयेत यासाठी विनंती करण्यासाठी आपले पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधानांना करत होते. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव आल्यापासून ते विचित्र वागत आहेत. मिलिटरी ग्रेडेड मटेरियल हिंदुस्थानकडून इस्राएलला पोहचवले जातंय, हे अमेरिकेला चांगलं वाटलं असेल. पण, ज्या देशातून आपल्याला गॅस येतो, कच्चं तेल येते, त्या देशांकडून नाराजी व्यक्त झाली आणि त्यांनी आपली भरलेली जहाज सोडलेली नाहीत. शेतीची खते, सल्फर सुद्धा भरलेली आहेत. पण, ते जहाज सुद्धा सोडले गेले नाहीत. याकडेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

0 टिप्पण्या