गझल मंथन साहित्य संस्था आणि परिवर्तन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ७ जून २०२६ रोजी पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची, तर स्वागताध्यक्ष म्हणून युवा गझलकार चेतन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी युवा गझलकार विशाल मोहिते यांना ‘युवा गझलकार - २०२६’ हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.संमेलनाचे उद्घाटन युवा गझलकार स्वप्नील शेवडे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ गझलनवाज भीमराव पांचाळे यांना ‘गझल मंथन जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद जोशी उपस्थित राहणार असून सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव (देशमुख), डॉ. गिरीश इंगळे आणि प्रा. हेमंत सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
युवा गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या युवा गझल स्पर्धेतील सहभागींच्या गझलयात्री या संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.संमेलनात ज्येष्ठ गझलकारांचे मार्गदर्शन, चर्चासत्र तसेच पाच दर्जेदार मुशायरे आयोजित करण्यात आले आहेत. या संमेलनाचे आयोजन संस्थेच्या मुंबई कार्यकारिणीद्वारे करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, महाराष्ट्र समन्वयक प्रणाली म्हात्रे आणि मुंबई कार्यकारिणी अध्यक्षा योगिता तकतराव यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या