बौद्धांनी 2027 च्या जनगणनेत काय नोंद करावी यावर महाराष्ट्रात पुन्हा गोंधळ माजविणे सुरु झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आपल्या लाखों अनुयायांसाह बौद्ध धर्मात धर्मांतर करून हिंदू धर्माला हादरा दिला. या धम्मक्रांतीनंतर बौद्ध धर्माला पुनः नामोहरम कसे करायचे यावर ब्राह्मणवादी प्रवाहाने तात्काळ कार्यवाही सुरू केली. त्याचा परिणाम म्हणून 1962 नंतर देशभरात बौध्दांची संख्या उत्तरोत्तर कमी होण्यात झाला आहे. बौध्दांची संख्या वाढणे म्हणजे हिंदू धर्माला तडाखा बसणे आणि धम्मक्रांती यशस्वी होणे होय. ही संख्या वाढू नये यासाठी रा. स्व.-संघ भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारांनी अनेक राज्यात धर्मांतर विरोधी कायदे लागू केले आहेत.
या स्थितीत अनेक राज्यातील अनुसूचित जातीच्या समूहातील जे लोक आंबेडकरवादी विचारांचे आहेत; आणि प्रत्यक्ष जीवनात बौद्ध धर्मीय मूल्यांचे आचरण करतात त्यांना जनगणनेत धर्माच्या रकाण्यात बौद्ध आणि जातीच्या रकाण्यात त्यांची पूर्वाश्रमीची जात नोंद करण्याचे आवाहन करून देशभरात बौध्दांची संख्या कशी वाढवता येईल यासाठी गांभीर्याने रणनीती आखण्याची गरज आहे. याचे नेतृत्व महाराष्ट्रातील बौध्दांनी केले पाहिजे; कारण भारतातील एकूण बौद्धांपैकी 77% बौद्ध महाराष्ट्रात आहेत. मात्र महाराष्ट्रातील बौद्ध लोक ही ऐतिहासिक संधी समजून न घेता बौद्ध लिहावे जात लिहू नये अशी बिनबुडाची मांडणी करून गोंधळ निर्माण करीत आहेत. या गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांचे काही वैय्यक्तिक हितसंबंध असू शकतात.त्यांना दुर्लक्षित करून व्यापक समाजहिताचे भान ठेऊन यासंबंधी ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.भारतातील बौद्ध समाजाचे दोन प्रमुख प्रवाह : पारंपरिक आणि धर्मांतरीत बौद्ध- भारतातील बौद्ध लोकसंख्या ही केवळ धार्मिक समुदायाची आकडेवारी नसून ती आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे जितेजागते स्मारक आहे. विशेषतः 1956 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बौद्ध धर्मांतर चळवळीमुळे भारतातील बौद्ध समाजाचा एक नवीन सामाजिक-राजकीय प्रवाह उदयास आला. या प्रवाहाला “नवबौद्ध (Neo-Buddhist)” असे संबोधले जाते. या प्रवाहाने आधुनिक भारताच्या सामाजिक व्यवस्थेची पुनर्मांडणी केली आहे.
धम्मक्रांतिपूर्वीची बौद्ध धर्माची स्थिति - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतिपूर्वी भारतात अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल (दार्जिलिंग गोरखा क्षेत्र) ही पूर्वोत्तर राज्ये आणि जम्मू-कश्मीर (लडाख) व हिमाचल प्रदेश प्रदेश या हिमालयीन राज्यांमध्ये पारंपरिक बौद्ध राहत होते. त्यांची लोकसंख्या 1951 मध्ये 1 लाख 81 हजार होती. सन 2011 च्या जनगणनेनुसार या राज्यामधील पारंपरिक बौध्दांची लोकसंख्या जवळपास 11 लाख इतकी आहे. या पारंपरिक बौध्दांमध्ये पूर्वोत्तर राज्यातील मोम्पा,शेरदुकपेन,चकमा, भूतीया, खाम्प्टी, सिंग्पो, तवांग, बरुआ, मुघ, चगताई इ. प्रमुख जमाती आहेत. त्याचप्रमाणे हिमालयीन पहाडी भागातील न्युंग्म्पा, काग्युम्पा, साक्यपा, गेल्युंग्पा या प्रमुख जमाती आहेत. अनुसूचित जातीत मोडणाऱ्या काही जाती सुद्धा पारंपारिक बौद्ध आहेत.
धम्मक्रांतिनंतरची बौद्ध धर्माची स्थिति- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतिनंतर भारतातील बौद्ध लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे 1951: 1.81 लाख , 1961: 32.50 लाख, 1971: 38.12 लाख, 1981: 47.20 लाख, 1991: 63.88 लाख, 2001: 79.55 लाख, 2011: 84.43 लाख. ही आकडेवारी पाहिल्यास आंबेडकरी चळवळीच्या प्रभावामुळे जनगणनेत बौद्ध धर्मीय म्हणून नोंदविणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते.
भारतातील बौद्धांच्या लोकसंख्येत झालेली वाढ ही नैसर्गिक लोकसंख्या वाढीपेक्षा धर्मांतराच्या प्रक्रियेचे फलित आहे हे लक्षात घेतले पाहिजे. धम्मक्रांतीच्या नंतर प्रत्येक दशकात बौद्ध लोकसंख्या वाढत आहे हे जनगणनेच्या आकडेवारीवरून लक्षात आल्यानंतर ब्राह्मणवादी तंबूने जनगणनेत बौद्ध नोंदविणाऱ्याची संख्या कमी कशी होईल यासाठी धोरण आखले. त्यांच्या या जाळ्यात महाराष्ट्रातील तथाकथित अतिशुद्ध बौद्ध लोक फसले आणि त्यांनी जनगणनेसंबंधी गोंधळ सुरू केला. याचा परिणाम महाराष्ट्रातील बौद्धांचा लोकसंख्येतील वाटा (% Share) कमी होण्यात झाला आहे हे पुढील आकडेवारीवरून दिसून येईल. सन 1951: 0.01% , 1961: 7.05% , 1971: 6.48% , 1981: 6.29%, 1991: 6.39% , 2001: 6.03% , 2011: 5.81% ही आकडेवारी पाहिल्यास दिसून येईल की, महाराष्ट्रात बौद्धांचा वाटा 1961 मध्ये 7.05% इतका सर्वोच्च होता, परंतु 2011 मध्ये तो 5.81% पर्यंत घसरला. हा घसरणीचा प्रवाह दर्शवतो की महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या वाढीच्या तुलनेत बौद्ध समाजाचा वाढ दर कमीकमी होत आहे.
महाराष्ट्राच्या बाहेरील बौद्ध धर्माची स्थिति - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली इत्यादी राज्यातही बऱ्याच अस्पृश्य जातीनी आपली नोंद बौद्ध म्हणून केली. मात्र याचे प्रमाण अल्प होते. 1980 ते 1991 या कालावधीत मा. कांशीराम यांच्या चळवळीमुळे उत्तर भारतात जनगणनेत बौद्ध नोंदविण्याच्या प्रक्रियेला पुनः वेग आला. तत्याचे प्रतिबिंब पुढील आकडेवारीवरुन दिसून येईल ( उत्तर प्रदेशात 1961 साली 12,890 बौद्ध होते. ते 2001 मध्ये 3,14,400 झाले. 2011 मध्ये त्यात घट होऊन ती संख्या 2,21,200 झाली. म्हणजेच उत्तर प्रदेशातील बौद्धांच्या संख्येत 29.65% टक्के घट झाली. अशाच प्रकारे पंजाब मध्ये 1961 साली 2,330 बौद्ध होते. ते 2001 मध्ये 41,490 झाले. 2011 मध्ये त्यात घट होऊन ती संख्या 33,240 झाली. म्हणजेच पंजाब मधील बौद्धांच्या संख्येत 19.88% टक्के घट झाली. कर्नाटकात 1961 साली 9,770 बौद्ध होते. ते 2001 मध्ये 3,93,300 झाले. 2011 मध्ये त्यात घट होऊन ती संख्या 95,710 झाली. म्हणजेच कर्नाटकातील बौद्धांच्या संख्येत 75.70 टक्के इतकी अत्यंत तीव्र घट झाली. प्रत्येक राज्यातील जनगणेतील बौद्धांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, 1980- 2001 या दोन दशकात जनगणनेत बौद्ध नोंदविण्याच्या चळवळीचा विस्तार महाराष्ट्राबाहेरही वाढला होता.मात्र 2011 च्या जनगणनेत बौद्ध नोंदविणाऱ्याची संख्या कमी झाल्याचे दिसते. हा महाराष्ट्रातील बौद्धांनी जनगणनेत केवळ बौद्ध धर्म नोंदवावा जात नोंदवू नये या गोंधळाचा परिणाम आहे.
महाराष्ट्रातील बौद्धांनी जनगणनेत बौद्ध लोकसंख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा - महाराष्ट्रातील बौद्ध समुदाय हा भारतातील सामाजिक जागृतीचा आणि ऐतिहासिक परिवर्तनाचा वाहक असलेला समुदाय आहे. परंतु या समुदयामध्ये ब्राह्मणवादी शक्तींनी जे गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे त्यामुळे या समुदायाची प्रभावशक्ती व परिवर्तनाच्या लढ्यातील अग्रेसर स्थान यास धक्का पोहोचलेला आहे. भारतातील बौद्धांच्या लोकसंख्येतील महाराष्ट्रातील बौद्धांचे केंद्रीय स्थान टिकून असले तरी त्यांचा लोकसंख्येतील टक्का हळूहळू कमी होत आहे. भविष्यात बौद्ध समाजाची संख्या केवळ जन्मदरावर नाही तर सामाजिक-राजकीय वातावरण, स्थलांतर, धार्मिक ओळख आणि संघटनात्मक जागृतीवरही अवलंबून राहील. यामुळे महाराष्ट्रातील बौद्धनी या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून इतर राज्यातील अनुसूचित जातींचे लोक जनगणनेमध्ये त्यांचा धर्म बौद्ध व जातीच्या रकाण्यात त्यांची अनुसूचित जातीतील जात नोंदवावी यासाठी जागृती करणे गरजेचे आहे.
(वरील सर्व आकडेवारी 1951 ते 2011 सालातील जनगणना अहवालातुन घेतलेली आहे)
सुनील खोबरागडे

0 टिप्पण्या