Top Post Ad

नागरिकांसाठी नवे निर्बंध; मुंबई महापालिकेत ‘डीजी अॅप’ प्रवेश प्रणाली ?

मंत्रालयाच्या धर्तीवर आता मुंबई महापालिका मुख्यालयातही ‘डीजी अॅप’ आधारित डिजिटल प्रवेश प्रणाली लागू करण्याची हालचाल सुरू झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रणाली लागू करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली असून, यामुळे महापालिकेत येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली. मंत्रालयात २०१५ पासून सुरू असलेल्या ‘डीजी अॅप’ प्रणालीप्रमाणेच मुंबई महापालिकेतही डिजिटल पडताळणीद्वारे प्रवेश द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.

भाजपकडून महापालिकेतील बैठकींना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली असून, आता महापालिका मुख्यालयासाठी ‘डीजी अॅप’ प्रणाली लागू करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल की सामान्यांसाठी प्रवेश अधिक कठीण करेल, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.  महापालिका मुख्यालयातील चार ते पाच प्रवेशद्वारांवर ही प्रणाली अनिवार्य करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कोणती व्यक्ती कोणत्या कामासाठी महापालिकेत आली याची संपूर्ण डिजिटल नोंद ठेवणे हा यामागील उद्देश असल्याचे गणेश खणकर यांनी सांगितले. 

‘डीजी अॅप’ प्रणालीमध्ये संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक जोडला जात असल्याने अभ्यागतांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहणार आहे. सध्या गेटपासच्या माध्यमातून नागरिकांना प्रवेश दिला जातो. मात्र ही पद्धत बंद करून पूर्णपणे डिजिटल प्रणाली लागू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. यापूर्वीही खणकर यांनी सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी मांडली होती. सध्या मंत्रालयात नागरिकांना प्रवेशासाठी मोबाईलवर अॅप डाउनलोड करून नोंदणी करावी लागते. आधार कार्ड, चेहरा पडताळणी, क्यूआर कोड अशा प्रक्रियेनंतरच प्रवेशपत्र मिळते. दुपारी दोननंतरच सामान्यांना प्रवेश दिला जात असल्याने अनेकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. आता अशाच प्रकारची प्रणाली महापालिका मुख्यालयात लागू झाल्यास नागरिकांच्या प्रवेशावर वेळेची आणि प्रक्रियेची बंधने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com