Top Post Ad

मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील रेल्वे स्टेशनपरिसरातील अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर कारवाई

 वांद्रे पूर्वेकडील रेल्वे स्टेशनबाहेर गरीब नगर येथील तीन-चार मजली अनधिकृत झोपड्यांवर आज बुलडोझर फिरवण्यात आला. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटवण्यात आले.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000 हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. RPF, GRP आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात सज्ज ठेवण्यात आला होता. कारवाईदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दोन पूल बंद करण्यात आले होते.  रेल्वे परिसरात बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या हटवण्यासाठी 6 बुलडोझर आणण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नवीन रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक आहे. या विस्तारीकरण प्रकल्पासाठी   अनधिकृत बांधकामांसह गरीब नगर झोपडपट्टीवर आजपासून (19 मे) पाच दिवसांची मोठी तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.  हा भाग मोकळा झाल्यावर त्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.  मुंबई सेंट्रल आणि दादर स्थानकांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढता ताण लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी पावले उचलली आहेत. वांद्रे टर्मिनसचा सध्याच्या सात प्लॅटफॉर्मच्या पुढे विस्तार करणे आणि अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. प्रवाशांची वाढती मागणी पाहता अधिक गाड्या चालवण्यासाठी पुरेशा प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता आहे, ज्यामुळे मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशन्सची गरज निर्माण झाली आहे.

या  तोडक कारवाईनंतर जी जागा मोकळी होईल, तिचा वापर सर्वप्रथम वांद्रे टर्मिनस येथील डिझेल शेड हलवण्यासाठी केला जाईल. डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर मिळालेल्या अतिरिक्त जागेत टर्मिनसचा विस्तार केला जाईल आणि सात प्लॅटफॉर्मच्या पुढे नवीन प्लॅटफॉर्म उभारले जातील. सध्याची पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याकरीता वांद्रे टर्मिनस येथे 7 प्लॅटफॉर्म आहेत, येथून दररोज सुमारे 21 लांब पल्ल्याच्या गाड्यांचे ऑपरेशन सुरू असते. मुंबई सेंट्रल: 5 प्लॅटफॉर्म असून दररोज 20 गाड्या हाताळल्या जातात. दादर येथे 2 प्लॅटफॉर्म असून दररोज 10 गाड्या हाताळल्या जातात. वांद्रे टर्मिनसशिवाय पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी इतर दोन टर्मिनसवर काम सुरू आहे: जोगेश्वरी टर्मिनस येथे 2 प्लॅटफॉर्म आणि 12 गाड्या प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू असून यासाठी 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. तसेच वसई टर्मिनस  प्रस्तावित आहे. या ठिकाणी देखील 2 प्लॅटफॉर्म आणि 12 गाड्या प्रस्तावित असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

अतिक्रमणावर कारवाई झाली हे योग्यच. पण चार मजली झोपडपट्टी उभी राहत होती तेव्हा प्रशासकीय अधिकारी कुठे झोपा काढत होते? सत्ताधाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई का केली नाही? हा प्रश्न उरतोच. गरीब मिळेल तिथे अतिक्रमण करतो पण श्रीमंत अधिकारी आणि भूमाफिया अतिक्रमण पोसतात त्याचं काय? आता वांद्रे येथे बांगलादेशी घुसखोर आहेत, म्हणजे कारवाई झाली असे म्हणत असाल तर इतके वर्ष बांगलादेशी कोणी आणि का पोसले?आजच्या कारवाईनंतर हजारो माणसं रस्त्यावर आली. मुळात हे आज न उद्या होणारच होते. मात्र आजही यांना अभय देणारे भूमाफिया, राजकीय नेते आणि अधिकारी बंगल्यात राहतायत याचे दुःख आहे. अतिक्रमण उभं राहू देणाऱ्यांना आधी बेघर करा मग गरिबांवर खुशाल बुलडोझर फिरवा. कारण गरिबांना सगळं काही ठाऊक असतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com