आजकाल* समाजात एक नवा 'ट्रेंड' सुसाट सुटला आहे—तो म्हणजे वाढदिवसाचे राजकीय आणि सामाजिक प्रदर्शन! कधीकाळी घरातील चार भिंतीत साजरा होणारा वाढदिवस आता थेट गरीब वस्त्या, वाड्या आणि पाड्यांवर पोहोचला आहे. पण हा प्रवास प्रेमाचा नसून, स्वतःची दुकानदारी सजवण्याचा एक कुटील डाव आहे. लबाडीने आणि भ्रष्टाचाराने आलेला पैसा जेव्हा घरात ओसंडून वाहू लागतो, तेव्हा त्या काळ्या पैशाला 'सामाजिक प्रतिष्ठेची' पांढरी झूल चढवण्यासाठी अशा समारंभांचा जन्म होतो. पंचतारांकित हॉटेल्समध्ये वाढदिवस साजरा करायला पैसा कमी नाही, पण तिथे 'प्रसिद्धी' मिळत नाही. म्हणून मग ही लक्झरी गाडी वळते ती गरीब वस्तीतील महिलांकडे. कारण तिथे प्रश्न विचारणारे कुणी नसतात आणि गरिबीचा तमाशा मांडणं सोपं असतं.
साहेबांच्या घरातील कुणाही नातेवाईकांचा वाढदिवस असो—मग ती बहीण असो, वा सून,मेहुणा,भाचा असो.—सकाळपासून कार्यकर्त्यांची फौज सुटते. गोरगरीब महिलांना एकत्र केलं जातं आणि सुरू होतो 'पैठणीचा खेळ दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या महिलेला दिवसभराची मजुरी सोडून तिथे बसवलं जातं. मनात एकच आशा असते—"कदाचित मला ती साडी मिळेल." पण प्रत्यक्षात साडी मिळते एकीला आणि उरलेल्या शेकडो महिलांच्या पदरात पडतो तो केवळ वेळेचा अपव्यय आणि घोर निराशा. हा खेळ नाही, ही गरिबीची टिंगल आहे!स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्यांना आज एक प्रश्न विचारण्याची गरज आहे: तुमचे हे तथाकथित सामाजिक योगदान स्वतःच्या घामाच्या पैशातून आहे का? चोरी, भ्रष्टाचार आणि अनैतिक मार्गाने कमावलेल्या पैशाचा छोटासा तुकडा अशा दिखाऊ कार्यक्रमांवर उधळायचा आणि स्वतःला 'मसिहा' म्हणवून घ्यायचं, हा कुठला न्याय? ही सेवा नाही, हा तर प्रतिष्ठेचा मांडलेला बाजार आहे. या देशात संतांनी आणि समाजसुधारकांनी गरिबांच्या उन्नतीसाठी आयुष्य झिजवलं. पण त्यांनी कधीही गरिबीचा 'इव्हेंट' केला नाही. त्यांनी स्वाभिमान दिला, शिक्षण दिलं आणि जगण्याचे अधिकार दिले. आज मात्र एका पैठणीच्या नावाखाली महिलांचा आत्मसन्मान हिरावून घेतला जात आहे.
विचार करा: एका पैठणीने एखाद्या कुटुंबाचं आयुष्य बदलणार आहे का? ज्या व्यक्तीचा वाढदिवस तिथे साजरा होतोय, तिचा असा कोणता आदर्श आहे की जो त्या गरीब मुलांनी किंवा महिलांनी घ्यावा? गरिबांना आज तुमच्या उपकाराच्या 'खेळाची' गरज नाही; त्यांना गरज आहे शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याच्या संधींची. जर आपण आज या बनावट समाजसेवेचा बुरखा फाडला नाही, तर उद्या प्रत्येक उत्सव हा गरिबांच्या अश्रूंवर उभारलेलं प्रदर्शन बनेल. श्रीमंतीच्या जोरावर चालणारा हा 'मदारीचा खेळ' आता थांबायला हवा. खोट्या प्रतिष्ठेचा मुखवटा उतरवून एकदा स्वतःला विचारून बघा—जर हा लबाडीचा पैसा नसता, तर तुमची ही तथाकथित प्रतिष्ठा कुठे असती?
पत्रकार महेंद्र सोनावणे,(जादूगार एस्.महेंद्रा) 9822250493

0 टिप्पण्या