केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्व परीक्षेनिमित्त ठाणे महानगरपालिकेतर्फे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध परीक्षा केंद्रांवर विशेष “जनजागृती महाअभियान” राबविण्यात आले. या अभियानाद्वारे ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्या यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त जी. जी. गोदेपुरे आणि संस्थेचे संचालक महादेव जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या विशेष अभियानाद्वारे केवळ एका दिवसात तब्बल 2406 UPSC विद्यार्थी व पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला. तसेच 475 विद्यार्थ्यांनी संस्थेच्या 2026 मधील प्रवेश परीक्षेसाठी नावनोंदणी केली असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
रविवार, दि. 24 मे 2026 रोजी पार पडलेल्या UPSC पूर्व परीक्षेदरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर अंदाजे 300 ते 600 विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या प्रवेश परीक्षा (Entrance Exam) 2026, विद्यावेतन (Stipend), विद्यार्थी वसतिगृह, मुख्य परीक्षा मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा तसेच व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण (Foundation Course) याबाबत माहिती देण्यात आली. यासोबतच माहितीपत्रकांचे (Brochure) वितरणही करण्यात आले. विद्यार्थ्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेतील 35 अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील एकूण 26 परीक्षा केंद्रांबाहेर माहिती कक्ष (बूथ) उभारण्यात आले होते. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलंग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.
दरम्यान, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत यूपीएससी पूर्व व मुख्य परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश परीक्षा दि. 7 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 2 जून 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावा तसेच यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थीं / प्रशिक्षणार्थींनी सी. डी. देशमुख संस्थेच्या प्रवेश परीक्षेस (Entrace Exam) नाव नोंदणी करणेकरिता https://cdinstitute.register.epravesh.com/ या लिंक वर दि. 02/06/2026 रोजी पर्यंत क्लिक करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले.

0 टिप्पण्या