बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ अंतर्गत निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून आता प्रतीक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बुधवार, दि. १४ मे, २०२६ पासून प्रतीक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. या टप्प्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण १९५६ बालकांची निवड करण्यात आली असून संबंधित पालकांना दि. १५ मे, २०२६ पासून एसएमएसद्वारे माहिती पाठविण्यात येत आहे.
शाळांमधील उपलब्ध रिक्त जागांनुसारच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात येणार असल्याने पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील “Application Status” या टॅबमध्ये आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची सद्यस्थिती नियमितपणे तपासावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.प्रतीक्षा यादीतील पात्र बालकांच्या पालकांनी आपल्या बालकाचे अॅलॉटमेंट लेटर आरटीई पोर्टलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी. सदर अॅलॉटमेंट लेटरसह आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत जवळच्या पडताळणी केंद्रावर उपस्थित राहून पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी.दि. १५ मे, २०२६ ते दि. २३ मे, २०२६ या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांनी त्याची पावती घेऊन संबंधित शाळेत जाऊन अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. शिक्षण विभागामार्फत पालकांना वेळोवेळी सूचनांचे पालन करण्याचे तसेच आवश्यक कागदपत्रे पूर्ण स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित जागा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात, याची पालकांनी नोंद घ्यावी.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व सुलभता राखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पालकांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही अडचणीसाठी संबंधित पडताळणी केंद्र अथवा शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.” जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभागामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून सर्व पात्र बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या