रामदास हा मध्ययुगीन काळातील महान कवी होता. त्याने दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. तो प्रतिभावान कवी होता. त्याने रामदासी संप्रदायासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. वैवाहिक जीवनाचा त्याग करून त्याने आपल्या विचाराच्या प्रचारासाठी देशात परिभ्रमण केले. रामदासाचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे आहे, पण त्याच्या रामभक्तीमुळे त्याला रामदास असे म्हटले जाते. रामदासाला समर्थ रामदास स्वामी असेही म्हटले जाते. त्याचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी झाला. आपल्या संप्रदायाच्या प्रचारासाठी तो आजन्म अविवाहित राहिला. तो एक महत्वाकांक्षी आणि कर्तव्यकठोर कवी होता. रामदास हा कांही वारकरी संप्रदायातील नव्हता, त्यामुळे त्याला संत म्हणायचा प्रघात नाही. तर त्याचे अनुयायी त्याला ‘समर्थ रामदास स्वामी’असे म्हणतात.
समर्थ रामदासाचा जन्म १६०८ चा तर मृत्यू १६८२ साली झाला. म्हणजे तो शिवकाळातील आहे, याबाबत दुमत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास हे एकमेकांना भेटले असल्याचा ऐतिहासिक पुरावा नाही. समजा ते समकालीन असल्यामुळे एकमेकांना भेटले असे गृहीत धरले तरी (समकालीन व्यक्ती एकमेकांना भेटू शकतात) रामदास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु होऊ शकत नाही. तशी आयुष्याच्या विशेषत: स्वराज्य निर्मितीच्या अंतिम टप्प्यात रामदासाची गरज भासावी अशी परिस्थिती उरली नव्हती, कारण शहाजीराजे आणि जिजाऊंनी स्वराज्यनिर्मितीची उदात्त प्रेरणा शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण केली होती आणि त्यांना मावळ्यांनी मोलाची साथ दिलेली होती.
शिवचरित्राची अत्यंत महत्त्वाची संदर्भसाधने जेधे शकावली, शिवभारत, राधामाधवविलासंपु, पर्णालपर्वतगृहनाख्यान, सभासदरचित शिवचरित्र इत्यादी समकालीन ऐतिहासिक ग्रंथात रामदासाचा साधा नामोल्लेखदेखील नाही. तसेच शिवचरित्राचे वस्तुनिष्ठ अभ्यासक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, सेतुमाधवराव पगडी, वा. सी. बेंद्रे, त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि डॉ. जयसिंगराव पवार यांनी रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु, मार्गदर्शक, शिक्षक किंवा प्रेरणास्थान नव्हता असे सिद्ध केले आहे.
समकालीन संदर्भ साधने आणि महान इतिहास संशोधकांनी रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता हे सिद्ध केल्यानंतरदेखील रामदासी पंथ आणि कांही विशिष्ट लोकांचा रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु होता असे रेटून सांगण्याचा हट्ट का आहे? शिवाजी महाराजांच्या जागतिक कार्याचे श्रेय विशिष्ट जातीला मिळावे, यासाठी हा खोटारडा आणि केविलवाना प्रयत्न आहे. या दुराग्रहामुळेच शिवप्रेमी रामदासाला विरोध करतात. अन्यथा शिवप्रेमींचा आणि रामदासाचा व्यक्तिगत वाद नाही. रामदासाचे भक्त जेवढे रामदासाचा शिवरायांचे गुरु म्हणून दुराग्रह करतील तेवढे शिवप्रेमी त्याला विरोध करणारच. म्हणजे रामदासाची खरी बदनामी रामदासाच्या शिष्यांनी सुरू केली आहे. रामदासाला शिवरायांच्या गुरुस्थानी बसविण्यासाठी रामदासाच्या अनुयायांनी असंख्य खोट्या कथा निर्माण केल्या आहेत, की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करतात. त्याचा उल्लेख करण्यासाठी मन धजावत नाही. बर या कथा काही रामदासाने लिहिल्या नाहीत किंवा रामदाने तो शिवाजी महाराजांचा गुरु आहे, असे कधीही म्हटले नाही, याउलट रामदासाने शिवाजी महाराजांचे जे काव्यमय वर्णन केले आहे ते अतिशय सुरेख आहे, अप्रतिम आहे. पण रामदासी शिष्यांच्या दुराग्रहामुळे आणि विकृतीमुळे शिवप्रेमी रामदासाची लंगोटी काढत आहेत. रामदासी शिष्य रामदास शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून जेवढा प्रचार करतील, तेवढीच तिखट प्रतिक्रिया शिवप्रेमींकडून रामदासाबद्दल येत राहील.
रामदासी पंथाने रामदासाला शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसविल्यामुळे त्यांच्या या खोटारडेपणाला आलेल्या प्रतिक्रिया अत्यंत भयानक आहेत. त्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत. जवळकर म्हणतात “रामदास तो भंगडभाई”. रामदासाची शिवाजी महाराजांच्या पादत्राणाजवळ देखील बसायची लायकी नव्हती.” ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी तर हिंदू कादंबरीमध्ये जनाचा श्लोक लिहिला आहे की लग्नमंडपातून पळून जाणाऱ्या रामदासाला त्याची बायको पायताण दाखवून म्हणेल की “मनाची जरी नको ठेवू लाज जरी तू ,जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या थू.” रामदासी पंथाने रचलेल्या खोटारड्यापणाच्या कथेला या जहाल प्रतिक्रिया आहेत. असा खोटारडेपणा रामदासी पंथाने केला नसता तर रामदासाबद्दल कधीही कोणीही अपशब्द वापरला नसता. ब्राह्मण- ब्राह्मणेतर वादाच्या अनेक कारणापैकी हे एक महत्वाचे कारण आहे. रामदासी पंथातील लोकच रामदासाच्या बदनामीस जबाबदार आहेत, हे स्पष्ट होते. रामदास महान प्रतिभावान कवी होता. त्याने ब्राह्मणांच्या हितासाठी महान कार्य केले, हे सांगण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही, पण तो शिवाजी महाराजांचा गुरु होता, असा प्रचार करण्यास मात्र कायम विरोध असेल.
रामदास हा महान कवी होता. तो प्रतिभासंपन्न होता. त्याने विशिष्ट वर्गाच्या हितासाठी खूप कार्य केले, त्याबद्दल कांही लोकांना त्याचा अभिमान वाटणे हे काही गैर नाही. पण त्याला शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवणे हे आक्षेपार्ह आहे. रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु आहे हा भ्रम वि. का. राजवाडे यांनी आधुनिक काळात निर्माण केला याबाबत वस्तुनिष्ठ इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर लिहितात की “शिवाजीच्या कार्याची आखणी मुख्यतः समर्थांनी केली, राजवाड्यासारख्या प्रतिभावान तिखट लेखकाने या मताचा पुरस्कार व प्रचार हाती घेतल्याने त्याच्या भोळ्या भाबड्या भक्तांनी तोच क्रम उगाळण्याचे काम सर्वत्र चालू ठेवले. त्यामुळे हा समज जनमानसात दृढ होऊन बसला आहे….रामदासी पंथाने काही ऐतिहासिक, राजकीय कार्य महाराष्ट्रात घडवून आणले हा प्रवाद युरोपच्या इतिहासाच्या वडाची साल हिंदुराष्ट्राच्या पिंपळाला चिकटविण्याचा अव्यापारेषू व्यापार करणाऱ्या काही इंग्रजीशिक्षित कल्पकांच्या मेंदूची विकृती आहे….हनुमानस्वामीच्या रामदास चरित्राच्या आधारावर आधुनिक ब्राह्मणांनी शिवाजीच्या गुरुत्वाचे मोठेपण स्वतःच्या जातीला चिकटविणे ही तर भ्रमिष्टपणाची पराकोटी म्हटली पाहिजे” रामदास शिवाजी महाराजांचा गुरु नसताना तसा प्रचार करण्याची सुरुवात वि. का. राजवाडे यांनी केली, तसा प्रचार करणे ही मेंदूची विकृती आणि भ्रमिष्टपणा आहे, असे शेजवलकर म्हणतात. विशेषतः शेजवलकर हे ब्राह्मण होते. शेजवलकरांचे ऐकून तरी रामदासी रामदासाचे स्तोम थांबवून रामदासाची बदनामी थांबवतील, अशी आशा करूयात
—————————
डॉ. श्रीमंत कोकाटे
0 टिप्पण्या