Top Post Ad

पुणे शहरालगत खडकवासला धरणाच्या जवळ १० एकर जागेत एक नितांत सुंदर धम्म विनया मॉनेस्ट्री प्रकल्प

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व माजी मुख्य माहिती आयुक्त मा. रत्नाकर गायकवाड  आज वयाच्या 74 व्या वर्षीही अत्यंत उत्साहाने सद्धम्माच्या वृद्धीसाठी तन-मन-धनाने कार्यरत आहेत. त्यांच्या मेहनतीतून आणि त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली  पुणे शहरालगत  खडकवासला धरणाच्या जवळ  १० एकर जागेत एक नितांत सुंदर धम्म विनया मॉनेस्ट्री प्रकल्प उभा केला आहे. या ठिकाणी सांचीच्या स्तूपाची प्रतिकृति असलेले भव्य असे बुद्ध विहार, ५०० लोकांना एकाच वेळी ध्यान साधना करता येईल असा हॉल, उपासक आणि भिख्खूंच्या निवासासाठी निवासस्थाने, भव्य लायब्ररी अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी जनतेकडून मिळालेल्या दानातून आतापर्यंत जवळपास ४०  कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शासनाने   लगतची १०० एकर जागा या  प्रकल्पासाठी झाडे लावण्या साठी दिली असून तेथे वेळुवन मेडीटेशन  पार्क च्या कामा ची  नुकतेच सुरवात करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या दररोजच्या देखभालीसाठी, विजबिल, स्वच्छता, भिख्खू, कर्मचारी यांच्या  भोजन व्यवस्थेसाठी सुमारे  मासिक 5 लाखापर्यंत खर्च येतो. हा  सर्व खर्च लोकांच्या स्वेच्छेने मिळालेल्या दानातून भागविण्यात येतो. ही सर्व व्यवस्था उभी करण्यात या प्रकल्पासाठी आयुष्य वाहिलेल्या अनेकांचे  योगदान असले तरी यामागील प्रेरक शक्ती (Driving Force ) मा.रत्नाकर गायकवाड हे  आहेत.त्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने पूर्णत्वास आलेला  धम्म विनया मॉनेस्ट्री प्रकल्प हे  अत्यंत निसर्गरम्य आणि रमणीय प्रेक्षणीय स्थळ  म्हणून विकसित झाले आहे. या ठिकाणी दररोज शेकडो लोक भेट देत असतात.

मा.रत्नाकर गायकवाड हे समाजाच्या नैतिक आणि सर्वांगीण उन्नतीचा ध्यास असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच लोणावळा येथे बहुजन हिताय संघ (BHS) व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक कर्मचारी-अधिकारी असोसिएशन (MARAKA) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर आर्थिक उन्नतीचे प्रकल्प राबविण्यासाठी आराखडा निश्चित करण्यासाठी 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मा.रत्नाकर गायकवाड एक विस्तृत कृती आराखडा तयार करून त्याची अमलबजावणी करण्यासाठी कार्यक्रम दिला आहे. MARAKA चे अध्यक्ष मा. हाजी जतकर साहेब व मार्गदर्शक डॉ. सादिक पटेल साहेब यांच्या नेतृत्वात MARAKA आणि BHS च्या संयुक्त प्रयत्नाने राज्यभरात मागासवर्गीय आणि अल्पसंख्यक समूहाचे हजारो स्वयंसहाय्यता गट (SHG)स्थापन करण्यात येत आहेत. या माध्यमातून पुढील काही वर्षात एक प्रचंड अशी आर्थिक चळवळ महाराष्ट्रात निर्माण होईल आणि हजारो लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येईल अशा प्रकारे हे काम सुरू आहे. 

मा. रत्नाकर गायकवाड हे बौद्ध धम्माला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत. तथापि, काही हितसंबंधी घटकांकडून त्यांच्या कार्याविषयी समाजात विविध गैरसमज पसरविले गेले असून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर शारीरिक हल्लाही करण्यात आला; परंतु त्यांनी मोठ्या मनाने हल्लेखोरांना क्षमा  केली आहे. रत्नाकर गायकवाड यांच्यावर समाजासाठी काहीच केले नाही असा आरोप वारंवार केला जातो. वस्तुतः त्यांनी वैयक्तिक हितसंबंधांची कामे केली नसली, तरी व्यापक सामाजिक हितासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. गडचिरोलीचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्याची प्रशासकीय पायाभरणी केली. दुर्गम भागात कर्मचारी मिळत नसताना त्यांनी स्थानिक समाजातील युवकांना संधी उपलब्ध करून देत शेकडो अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी युवकांना शासकीय सेवेत आणण्यास हातभार लावला.

समाजकल्याण संचालक म्हणून त्यांनी अनुसूचित जातींसाठी ६०० वसतिगृहांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना दिली. त्यांच्या कार्यकाळात विक्रमी संख्येने वसतिगृहे सुरू झाली आणि आज राज्यभर दिसणाऱ्या शासकीय वसतिगृहांच्या जाळ्याचे ते प्रमुख शिल्पकार ठरले. ते मुख्य सचिव झाल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातींच्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्णय घेतला व त्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी केलेले हे काम अतुलनीय आहे. 

बार्टी (BARTI) संस्थेच्या बळकटीकरणातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. संस्थेच्या नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्यापासून ते तिच्या उभारणीपर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजकल्याण सचिव म्हणून त्यांनी अनुसूचित जातींसाठी वैमानिक प्रशिक्षण योजना सुरू केली, स्वतंत्र आश्रमशाळांच्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आणि परदेशी शिष्यवृत्ती योजनेची बीजे रोवली. आज शेकडो विद्यार्थ्यांना लाभदायी ठरलेली ही योजना त्यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे.

खैरलांजी हत्याकांडानंतर अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोडल अधिकारी म्हणून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला. त्या अहवालातील निष्कर्षांमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची अस्वस्थता वाढली; परंतु त्यांनी कोणतीही चूक न केल्याची भूमिका ठामपणे मांडली आणि माफी मागण्यास नकार दिला. परिणामी त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली, तरीही त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचा त्याग केला नाही.

धम्मकार्याच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांची नियुक्ती झालेल्या बहुतेक ठिकाणी त्यांनी स्थानिक लोकाना सहकार्य करून बुद्ध विहारे ई. बांधण्यास हातभार लावला आहे. सोलापूर येथील भव्य बुद्ध विहाराचे बांधकाम त्यांच्या पुढाकारामुळे पूर्ण झाले.देहूरोड येथील बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, काही हितशत्रुनी त्यात खोडा घातला त्यामुळे अजूनही हे काम पूर्णवस्थेत येऊ शकलेले नाही.मुंबईतील नाहूर स्टेशनच्या बाजूला राजगृह बुद्धविहाराची चार मजली इमारत उभी आहे. या इमारतीसाठी रत्नाकर गायकवाड साहेबांनी जागा उपलब्ध करुन दिली व बांधकामासाठी सर्व प्रकारचे सहाय्य केले. गोराई येथील जगप्रसिद्ध विपश्यना पॅगोडा बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून घेणे, रस्ता बांधणे,विविध प्रकारच्या शासकीय मंजूरी मिळवणे,निधी संकलन करणे इत्यादि स्वरूपात त्यांचा जवळपास ८० टक्के वाटा आहे.

रत्नाकर गायकवाड यांना आंबेडकर भवन पाडण्यास जबाबदार धरून त्यांना प्रचंड बदनाम करण्यात आले. त्यांच्यावर शारीरिक हल्लासुद्धा करण्यात आला. मात्र या प्रकरणाची सत्य आणि कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. वास्तविकत: त्यावेळी समाजातील लोकांनी खोट्या अफवांवर विश्वास ठेऊन भावनिक उद्रेक केला नसता तर आज पूर्णतः समाजाच्या मालकीची आंबेडकर भवनाची १७ मजली भव्य वास्तु उभी राहिली असती. ही वास्तू उभी राहावी यासाठी BARTI या संस्थेला इमारतीतील दोन मजले ३० वर्षाच्या लिजवर देऊन त्यांच्याकडून जवळपास ७० कोटी रुपये घेण्याचे तत्वत: मान्य करण्यात आले होते. शासनाने ६  कोटी रुपये मंजूर केले होते. निधीची ही जमवाजमव रत्नाकर गायकवाड यांच्या प्रयत्नातुन झाली होती. मात्र काही काही हितशत्रुनी चुकीची, धादांत खोटी माहिती पसरवून यात रत्नाकर गायकवाड यांना जाणीवपूर्वक बदनाम करून पूर्णतः समाजाच्या मालकीची इमारत बांधण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

मा. रत्नाकर गायकवाड बदनामीचे असंख्य वार झेलत आज वयाच्या ७४ व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने समाजकार्यात आणि धम्मकार्यात मग्न आहेत. त्यांना बळ मिळो आणि उत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच सदिच्छा !!  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com