बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक इतकेच नव्हे तर बारा ज्योतिर्लिंगांतील सर्वात पहिले असे श्रीसोमनाथ मंदिर ! परकी आणि यवनांच्या आक्रमणाने कैक वेळा धराशायी झालेल्या या सोमनाथ मंदिराच्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या शुभहस्ते पुनर्निर्माणाला ७५ वर्षे होत असल्याचाही 'इव्हेंट' विकासपुरुष म्हणून स्वतःला म्हणवून घेणाऱ्या 'इव्हेंटपुरुष' प्रधानसेवक नरेंद्रभाई दामोदरदास मोदी यांनी केला त्याबरोबरच महामहीम राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांनी 'एकाला लागली चट.....' या न्यायाने या इव्हेंट मध्ये स्वतः ला सर्वांनी झोकून दिले. पान पान भर जाहिराती देणे हा तर डाव्या हातचा मळ. बारा ज्योतिर्लिंगांच्या स्तोत्राची सुरुवातच मुळी 'सौराष्ट्रे सोमनाथंच'ने होते. अशा या सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात एक उत्सव सरकारच्या खर्चाने भारतीय जनता पक्षाने केला आहे.
देश चालवण्याची जबाबदारी च्या प्रधानसेवकांवर आहे त्यांनी आपली संपूर्ण दिनचर्या जर मंदिर चालवण्या आणि पूजाअर्चा यातच घालवली आणि त्याला राज्यपाल आणि मुख्यमंत्री, मंत्री यांनी देत राहिले तर मग हिंदुस्थानच्या १४० कोटी नागरिकांनी करायचे काय ? हा मूलभूत सवाल आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता तेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुस्पष्टपणे सल्ला दिला होता की हिंदुस्थानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत या बाबतचा प्रस्ताव मंजूर करुन घेत हा प्रश्न मार्गी लावावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही हीच भूमिका मांडतांना 'मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे', अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. परंतु ते ऐकण्यात आले नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक/धार्मिक प्रश्न मार्गी लावला. प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सोडविला मात्र स्वतःच्या टिऱ्या बडवून जणू हा निर्णय आपणच घेतला असल्याचे भासवून आधी भूमिपूजन आणि नंतर लोकार्पण करण्यात आले. याचेही इव्हेंट करतांना अकरा दिवस उपवास करुन नाशिकच्या काळाराम मंदिराच्या महापूजेपासून अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा देवदुर्लभ सोहोळा यथासांग पार पाडण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन पासून आपले ऐकणाऱ्या स्वामींपर्यंत तसेच गौतमभाई अदानींपासून मुकेशभाई अंबानींपर्यंत साऱ्यांनी झाडून हजेरी लावली.RSSच्या स्वयंसेवक असलेल्या शीर्षपदस्थांच्या हस्ते हे पूजाविधी यथासांग पार पाडण्यात आले. यांचाही निवडणुकीच्या प्रचारासाठी पुरेपूर वापर करुन, "जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे", अशा बुलंद नाऱ्यांनी सारी नगरी नटवून थटवून माहौल बनविण्यात आला. तरी सुद्धा नाशिक येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे रामभाऊ वाजे हे खासदार म्हणून निवडून दणदणीत मतांनी निवडून आले तर अयोध्येत समाजवादी पक्षाचे उमेदवार सायकलीवर संसद भवनात पोहोचले. काशी विश्वनाथ मंदिर असलेल्या पावन भूमीत नरेंद्रभाई स्वतः तीन फेऱ्या मागे होते. प्रभू श्रीराम चंद्रांनी पाठ फिरवली परंतु भगवान शंकरांने नाक कापण्यापासून वाचविले. निवडणूक आली की आणि मतदान झाले की तासनतास केदारनाथ असो की भगवान शंकराची गुहा असो, महाराज ध्यानमग्न अवस्थेत. त्याचेही इव्हेंट.
मुळामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येत प्रभू रामलल्लाचे दर्शन खुले केले. तसेच तत्कालीन पंतप्रधान पामलू वेंकट उर्फ पी व्ही नरसिंह राव यांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त होण्याचा मार्ग प्रशस्त केला. ज्या क्षणी बाबरी पतनास प्रारंभ होत असल्याचे नरसिंह राव यांना समजले त्या क्षणी हा प्रकांड पंडित, उच्च विद्या विभूषित देशभक्त आपल्या निवासस्थानी दार बंद करुन महापूजेला बसला आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्याचे समजताच आपली महापूजा थांबविली. हे यांचे महत्वपूर्ण योगदान कदापि विसरता येणार नाही. या मान्यवरांनी याचा कधी 'इव्हेंट' केला नाही की त्याचे 'फोटोसेशन' करीत स्वतःच्या टिऱ्या बडवून घेतल्या नाहीत. लोहपुरुष आणि देशाचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSSवर बंदी घातली आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही बंदी उठवली. पण उठता बसता नेहरुंना शिव्या तर सरदार वल्लभभाई पटेल यांचे उदात्तीकरण. कॉंग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ सरदार वल्लभभाई पटेल यांचे उदात्तीकरण चांगलेच आहे. परंतु यात तुमचे योगदान काय ? दुसऱ्याचे श्रेय घेण्याची अहमहमिका जणू यांच्यात लागली आहे. बरं, टाळ्या वाजविण्यासाठी आयात 'टाळकरी' कमी नाहीत.
सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सौराष्ट्राच्या सोमनाथ मंदिराच्या गर्भगृहात स्वतः नरेंद्रभाई भस्म लावून महापूजेला बसलेत आणि त्याचवेळी आमचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी मंदिर येथील धाकलेश्वर महादेव मंदिरात महापूजा बांधली. पान पानभर जाहिरातीत मुख्यमंत्री भगवी टोपी परिधान करून दिसताहेत परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हातात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र असलेल्या लोकराज्य. ज्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. हां एक म्हणता येईल की ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली त्या राज्यघटनेच्या आम्ही कशा चिरफळ्या उडविल्या त्याची जनतेला निश्चितच आठवण करुन देणारे हे छायाचित्र आहे. सर्वत्र अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा 'अमृतकाल' 'अमृतकाल' असा अक्षरशः उदोउदो चाललाय
परंतु गेल्या ७५ वर्षांत अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करु शकलो आहोत कां ? याचा अजिबात विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या साठी नजराणा पाठविला होता. तुकाराम महाराज यांच्या पत्नी आवडाबाई आणि मुलांनी भरजरी पैठणी वस्त्रे परिधान करून मिरवू लागले. एवढ्यात तुकाराम महाराज आले आणि त्यांनी ते सर्व नश्वर असल्याचे सांगून परत केले. तुकाराम महाराज यांच्या तत्वचिंतक प्रवचनाने भारावून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे शिष्यत्व पत्करून राजपाट त्याग करण्याची मनीषा बोलून दाखविली. तेंव्हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्यशकट हाकणे, प्रजेचा सांभाळ करणे हे कर्तव्य आहे असा उपदेश केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या इच्छेपासून परावृत्त केले.
आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यशकट हाकणारे जर देश चालविण्याऐवजी देवळेच चालवीत असतील तर त्यांना काय म्हणणार ? हिंदुस्थानात आठ पीठाचे आठ शंकराचार्य आहेत त्यांना ही कामे सोपविणे केंव्हाही चांगले, या शंकराचार्यांनी सुद्धा सरकारला जाब विचारला पाहिजे की आमच्या धर्मकार्यात सरकारने ढवळाढवळ करु नये. सरकारने सरकारचे काम करुन देशातील १४० कोटी जनतेला सुखी, समृद्ध जीवन कसे जगता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, अशी सर्वसामान्य माणसांची भावना आहे. अरे, हे देश चालवताहेत की देवळं ? असा साधा प्रश्न जर सर्वसामान्य माणूस उपस्थित करता झाला तर तो दोष कुणाचा ? आमचे एक सन्मित्र प्रकाश सावंत यांनी त्यांच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील निर्व्हाळ या गावी मंदिर उभारणीस विरोध केला आणि देशाला मंदिरांची नाही, तर विद्यामंदिरांची गरज आहे, असे नीक्षून सांगितले. पण लक्षात कोण घेतो ? तूर्तास इतकेच ! -
- योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.
- (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).

0 टिप्पण्या