विविध जिल्हयातील शासकीय गोदामांमधील धान्य पुरवठ्याचे काम खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्याच्या निषेधार्थ आपली रोजी रोटी वाचवण्यासाठी सुमारे १० हजार माथाडी कामगार आज राज्य भरातील विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले.उद्या मंगळवारी हे कामगार राज्यभरातील तहसिल कार्यालये व तालुकास्तरीय शासकीय गोदामांवर धडक देणार आहेत.आज या कामगारांनी ठाणे,रायगड-अलिबाग, पालघर यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर तळपते उन- कडक उन्हाची पर्वा न करता जोरदार धरणे आंदोलन केले. हे धरणे आंदोलन महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
माथाडी कामगार एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतो घेणार नाही-घेतल्या शिवाय राहणार नाही,कंत्राटी कामगार भरती बंद करा... बंद करा... माथाडी कामगारांवरील संकट दूर करा...दूर करा.... अशा घोषणा धरणे आंदोलनात या माथाडी कामगारांनी दिल्या.या घोषणांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.
आज झालेल्या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळ, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन आदी संघटनाचे पदाधिकारी आणि असंख्य माथाडी कामगार सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा बचाव कृती समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील,माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, पोपटराव पवार, महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार, प्रकाश पाटील, भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन सरचिटणीस अरुण रांजणे ट्रान्सपोर्ट अँड डाॅक वर्कर्स युनियनचे नेते किशोर कोतवाल,केरसी पारीख, निवृत्ती धुमाळ आदी नेत्यांनी जोरदार समर्थन केले आहे.
शासकीय धान्य गोदामातील धान्यांची चढ - उतार करणे, पोत्याची थप्पी लावणे ही कामे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार करतात. मात्र आता खासगी ठेकेदारांमार्फत रेशन दुकानांना थेट धान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनाची पावले पडत आहेत याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन आज केले ,असे भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन सरचिटणीस अरुण रांजणे यांनी सांगितले.


0 टिप्पण्या