कोकण रेल्वेचे शिल्पकार, माजी रेल्वेमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकास देण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्राच्या मान्यतेनंतर, सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे होणार आहे. रेल्वेमंत्री व केंद्रीय अर्थमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हटले जाते. कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यांनी कोकणच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केला.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोकण रेल्वे सुरू झाली, अशी कोकणवासियांची भावना आहे. त्यामुळे त्यांचे नाव कोकण रेल्वेमार्गावरील महत्वाच्या अशा सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी गेली काही वर्षे केली जात आहे. या लोकभावनेची दखल घेऊन सावंतवाडी रेल्वे स्थानकास ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या नामकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृह व रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे.इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून मधु दंडवते सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात ते रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात ते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते. ते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले

0 टिप्पण्या