विविध जिल्हयातील शासकीय गोदामात धान्य पुरवठ्याचे काम खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याच्या दिशेने राज्य सरकारच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत.परंतु यामुळे दहा हजार माथाडी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आवाज उठविण्यासाठी माथाडी कामगार उद्या २५ व २६ मे रोजी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. शासकीय धान्य गोदामातील धान्याची चढ - उतार करणे, पोत्याची थप्पी लावणे ही कामे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगार करतात. राज्यभरातील या कामगारांची संख्या दहा हजाराहून अधिक आहे. मात्र आता खासगी ठेकेदारांमार्फत रेशन दुकानांना थेट धान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने शासनाची पावले पडत आहेत.
ठेकेदाराच्या माध्यमातून धान्याच्या पोत्यांची थेट वाहतुक करुन ती परस्पर शिधावाटप दुकानांमध्ये पोहोचती करणे, पोत्यांचे वजन करून ती उतरवून देणे, दुकांनामध्ये त्यांची थप्पी लावून देणे ही कामे वाहतुक कंत्राटदारांच्या अनोंदित कामगारांकडुन करुन घेण्याबाबत शासनाने २१ व २४ एप्रिल रोजी आदेशच जारी केले आहेत. यामुळे भविष्यात शासकीय गोदामांमध्ये धान्यच येणार नाही व परिणामी गेली कित्येक वर्षे हे काम करणारे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदीत माथाडी कामगार बेरोजगार होण्याचा धोका आहे,असे भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन सरचिटणीस अरुण रांजणे यांनी सांगितले.शासनाच्या निर्णयाबाबत संबंधित ठेकेदार व वाहतुकदार यांची असोसिएशन व माथाडी संघटना यांच्या शासकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. या बैठकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोदामातील कामासह पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील माथाडी स्वरुपाची सर्व कामे नोंदीत माथाडी कामगारांकडून करुन घेण्याबाबत शासन निर्णयामध्ये तरतुद करण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर नोंदीत कामगार करीत असलेले काम टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून हिरावून घेतले जाऊन ते बेरोजगार होण्याची शक्यता आहे असेही अरुण रांजणे यांनी म्हटले आहे.
२५ मे व २६ मे रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळ, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन आदी संघटना सहभागी होणार असल्याचेही अरुण रांजणे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या