देशातील अशा एका वाघिण जिच्या धाडसामुळे देशात पहिल्यांदाच समुद्री कासवांच्या हत्येवर आणि तस्करीवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली! बंगळुरूमध्ये जन्मलेली 'जगन्नाथन विजया' म्हणजेच भारताची 'टर्टल गर्ल'—जिने निसर्ग आणि वन्यजीवांसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली!" लहानपणापासूनच प्राण्यांबद्दल प्रचंड आपुलकी असलेल्या विजयाने अवघ्या १९ व्या वर्षी 'झूलॉजी'चे (Zoology) शिक्षण घेत असताना 'मद्रास स्नेक पार्क'मध्ये एक वॉलेंटियर म्हणून काम सुरू केले. तिच्या कामाची जिद्द पाहून प्रसिद्ध हर्पेटोलॉजिस्ट रोम्युलस व्हिटेकर खूप प्रभावित झाले.
१९८० मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी विजया ही भारताची पहिली महिला 'हर्पेटोलॉजिस्ट' (सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणारी शास्त्रज्ञ) बनली. तिच्यावर देशभरातील कासवांचे सर्वेक्षण करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. डाकूंचे साम्राज्य असलेल्या चंबळच्या खोऱ्यांपासून ते पूर्व भारताच्या अवैध मांस बाजारांपर्यंत विजयाने एकटीने प्रवास केला. 'ऑलिव्ह रिडले' (Olive Ridley) कासवांची कशी निर्घृण हत्या केली जाते, याचे धक्कादायक फोटो तिने आपल्या 'ब्लॅक अँड व्हाईट' कॅमेऱ्यात कैद केले. जेव्हा हे फोटो वर्तमानपत्रात आले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तात्काळ दखल घेत समुद्री कासवांच्या हत्येवर आणि तस्करीवर भारतात पूर्णपणे बंदी घातली! संशोधनासाठी कासवांचा माग काढायला (Tracking) तेव्हा तिच्याकडे महागडे रेडिओ ट्रॅकर खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी विजयाने कासवांच्या पाठीवर 'धाग्याची रील' बांधून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची भन्नाट आणि स्वस्त युक्ती शोधून काढली होती.जंगलातील गूढ शोधणाऱ्या विजयाचा अंतही एका गूढ पद्धतीनेच झाला. १९८७ मध्ये वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी तिचा मृतदेह केरळच्या जंगलात संशयास्पद स्थितीत आढळून आला. तिचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली की अपूर्व अपघात? हे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. तिचे नाव अजरामर झाले! जरी विजया आज आपल्यात नसली, तरी २००६ मध्ये शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या एका दुर्मिळ कासवाच्या प्रजातीला तिच्या सन्मानार्थ 'फॉरेस्ट केन टर्टल' (Forest Cane Turtle - Vijayachelys silvatica) असे नाव दिले! आज समुद्रात श्वास घेणारे लाखो कासवे विजयाच्या त्याच शौर्याची साक्ष देत आहेत. "कोणत्याही अत्याधुनिक सुविधेविना, वयाच्या २२ व्या वर्षी एकटीने जंगलात राहून कासवांचे प्राण वाचवणाऱ्या जगन्नाथन विजयाच्या या अद्भूत बलिदानाबद्दल देश कायम तीचा ऋणी राहिल.

0 टिप्पण्या