महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजावर होत असलेल्या कथित अन्याय, अत्याचार आणि धार्मिक हक्कांच्या हननाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ५ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ख्रिस्ती समाज अन्याय अत्याचार निवारण कृती समितीचे ॲड संजय वाघमारे, मनीष देशमुख यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला प्रा. रूपस कलकत्ते, पास्टर प्रकाश बोईनी, पास्टर यहोशवा कसबे, बर्नाड नाडार, पास्टर आशिष राव, अनिल बोईर, सिस्टर ज्योती गोंजाल आणि पास्टर संजय लोंढे आदी उपस्थित होते. ५ जूनच्या महामोर्चापूर्वी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी समितीने दिला.
ॲड संजय वाघमारे यांनी सांगितले की, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी गेल्या दोन वर्षांत राज्यातील ख्रिस्ती समाजावर संघटितपणे हल्ले आणि धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार वाढले आहेत. पालघर, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गेल्या १८ महिन्यांत ४० हून अधिक चर्च आणि प्रार्थनास्थळांवर हल्ले झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. तसेच २०० हून अधिक पास्टर आणि ख्रिस्ती बांधवांवर बळजबरी धर्मांतराचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.प्रार्थना सुरू असताना धार्मिक स्थळांमध्ये घुसखोरी करून तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करत, काही ठिकाणी प्रार्थनेसाठी पोलीस प्रशासनाकडून एनओसीची सक्ती केली जात असल्याने घटनात्मक अधिकारांवर मर्यादा येत असल्याची भूमिका समितीने मांडली. यावेळी समितीने शासनाकडे आठ प्रमुख मागण्या मांडल्या. चर्च आणि पास्टर यांच्यावरील हल्ल्यांतील आरोपींना तात्काळ अटक करणे, धर्मांतराच्या नावाखाली दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे मागे घेणे, ख्रिस्ती समाजावरील हल्ल्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमणे, चर्च व प्रार्थना केंद्रांना पोलीस संरक्षण देणे, नुकसानग्रस्त चर्चना आर्थिक मदत देणे, खाजगी जागेत प्रार्थनेसाठी परवानगीची आवश्यकता नसल्याबाबत शासन निर्णय काढणे, द्वेषपूर्ण प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि राज्य अल्पसंख्याक आयोग अधिक सक्षम करणे या मागण्यांचा त्यात समावेश आहे.

0 टिप्पण्या