मुंबईतील ज्या विभागातील नगरसेवक निवडणुकीचा निकाल सर्वात उशीरा लागला अशा प्रभाग क्रमांक 180च्या उमेदवारानी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वतःची सहिच केली नसताना, तसेच आपल्या संपत्तीची देखील खोटी माहिती दिली असताना त्याचा अर्ज ग्राह्य कसा धरला जातो, त्याचप्रमाणे या नगरसेविकेच्या अनधिकृत बांधकामावर महापालिका मेहेरबान का असा सवाल आज सामाजिक बांधिलकी संघटना मुंबई यांच्या वतीने प्रमोद सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केला. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित सर्व विभागांना पत्र पाठवणार आहोत असेही प्रमोद सावंत यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले. यावेळी संघटनेचे कमलाकर शिंदे आणि रुपेश पुरळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८० मधील शिवसेना नगरसेविका तथा बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील कथित त्रुटींवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेने त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप करत नगरसेवक पद तसेच बेस्ट समितीच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटविण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, निवडणूक नामांकन अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या अंतिम पानावर आवश्यक स्वाक्षरी नसल्याने ते अपूर्ण ठरते. अशा स्थितीत संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी ते प्रतिज्ञापत्र स्वीकारले कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विश्वासराव यांनी स्वतःची तसेच त्यांच्या पतीची काही मालमत्ता प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली नाही. मालमत्तेची माहिती लपविणे ही मतदारांची दिशाभूल असून या संदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.याशिवाय, वडाळा (पूर्व) येथील गणेशनगर परिसरातील विश्वासराव यांच्याशी संबंधित शाळेची इमारत अनधिकृत असून. या इमारतीच्या अगदी जवळून उच्चदाब विद्युत वाहिनी जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या कथित अनियमितता गंभीर स्वरूपाच्या असल्याचे नमूद करत, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा बांधिलकी सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या आरोपांबाबत तृष्णा विश्वासराव म्हणाल्या ...आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून मी निवडणूक आयोगापासून काहीही लपवलेले नाही. ही केवळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. आरोप करणाऱ्यांच्य काळ्याधंद्यांविरोधात मी पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली होती, त्याचाच वचपा काढण्यासाठी हे राजकारण केले जात आहे. या खोट्या आरोपांविरोधात मी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

0 टिप्पण्या