राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या धडक मोहिमेत अवघ्या तीन दिवसांत २ कोटी ११ लाख ८७ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत १६ आरोपींना अटक करण्यात आली असून चार आस्थापना सील तर तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार १३ ते १५ जून दरम्यान बृहन्मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच इतर अन्नपदार्थांच्या साठ्यांवर धाडी टाकण्यात आल्या.
गुटखा आणि पानमसालाविरोधातील कारवाईत सुमारे ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती विभागात तीन आस्थापनांवर कारवाई करून ७०.९२ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आणि तीन जणांना अटक करण्यात आली. नागपूर विभागात चार आस्थापनांवर कारवाई करून ७.२५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला तसेच चार आरोपींना अटक करण्यात आली. पुणे विभागात दोन आस्थापनांवर कारवाई करून १.५७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर कोकण विभागात तीन आस्थापनांवर कारवाई करून ३.०९ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात गुटखा विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीच्या आरोपाखाली मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय सुपारी, खाद्यतेल, खवा, पेढा, तूप आणि इतर अन्नपदार्थांवरही धाडी टाकण्यात आल्या. राज्यभरातील १० आस्थापनांवर कारवाई करून १ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा सुमारे ५१ हजार ६०६ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये पुणे विभागातील कारवाई सर्वाधिक ठरली.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद प्रकारांची माहिती FDAला द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारींसाठी FoSCOS पोर्टल, फूड सेफ्टी कनेक्ट अॅप किंवा १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिरीष वानखेडे

0 टिप्पण्या