सी.आय.टी.यु.या कामगार संघटनेच्या पुढाकाराने, महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,मोलकरणी, बांधकाम कामगार, कंत्राटी व असंघटित कामगारांच्या समस्या व न्याय मागण्यांसाठी १-३ जून पर्यंत मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलकांच्या न्याय मागण्यांना पाठींबा देण्यासाठी सुप्रसिद्ध वारकरी, किर्तनकार श्यामसुंदर सोन्नार महाराज व त्यांचे सहकारी टाळ मृदंग व अन्य वाद्य घेऊन आझाद मैदानात आले होते.तसेच चळवळीतील शाहीर आपले डफ घेऊन मैदानात आले असताना, तेथील पोलिसांनी त्यांना वाद्ये घेऊन जाण्यास मनाई केली.तेव्हा वारकरी, किर्तनकार,शाहीरांनी आम्ही वाद्या शिवाय किर्तन,गाणी कशी गाऊ शकतो असा पोलिसांना सवाल केला व या बाबतीत अधिकृत पत्र,आदेश आहे का असा प्रश्न केला असता,त्याचे पोलिसांनी समाधानकारक उत्तर न देता, आम्हाला सरकारचा वरून " आदेश" आहे एवढेच सांगितले.आणि सर्व वाद्ये पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतली व शाहीर, किर्तनकारांना मैदानात प्रवेश दिला.
पोलिस व सरकारच्या या हुकुमशाहीवृत्तीचा व कलावंताच्या या मुस्कटदाबीचा आझाद मैदानावर वरील आंदोलकांना पाठींबा देत असतानाच व वाद्यां शिवाय कार्यक्रम करताना श्यामसुंदर सोन्नार महाराजांनी व अन्य शाहिरांनीही जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच आंदोलनाचे आयोजक व सीटू कामगार संघटनेचे नेते राज्य अध्यक्ष कॉ. डॉ डी.एल.कराड यांनीही शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, लोकशाहीर कॉ.अमर शेख व आंबेडकरी शाहीर वामनदादा कर्डक यांनी डफावर थाप मारत शिवाजी पार्क मैदाना पासून ते आझाद मैदाना पर्यंत, रस्त्यावर पोवाडे, गाणी गात सारा महाराष्ट्र जागा केला व वैचारिक प्रबोधन केले.
आज तोच डफ व वाद्ये " आझाद मैदानात " वाजवण्यास ,शासन व पोलीस मनाई करीत आहे,ही अत्यंत संतापजनक व चीड आणणारी बाब आहे.वारकरी, किर्तनकारांवर, कलावंतांना वाद्ये वाजवण्याची मनाई करणे हा वारकरी संप्रदायाचा, विद्रोही संत कबीर, विद्रोही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर जनाई, चोखोबा आदींचा अपमान आहे. विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, लोक सांस्कृतिक चळवळचे सेक्रेटरी सुबोध मोरे, जनवादी लेखक संघाचे सेक्रेटरी मुख्तार खान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अविनाश कदम,जागर लढाऊ लोक आघाडीचे दिपक पवार, एल्गार सांस्कृतिक मंच चे धम्मा रणदिवे,आपला सिनेमा चळवळीचे चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समितीचे अश्विन कांबळे, सुनील कदम, शशांक कांबळे,अरूण कांबळे,आदी शाहीर कलावंतानीही शासनाच्या मुस्कटदाबीचा व कलावंताच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार्या वृतीचा तीव्र निषेध केला आहे. तसेच वरील सांस्कृतिक संघटनांतर्फे सर्व प्रगतिशील, फुले - आंबेडकरी लेखक कलावंतांना आवाहन करीत आहोत की त्यांनीही शासनाच्या या हुकुमशाही फतव्याचा जाहीर निषेध,सोशल मीडियावर करावा असे आवाहन सुबोध मोरे (7709876029) यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या