दिनांक 14 मे रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे अ.भा.काँग्रेस- अल्पसंख्यांक विभागाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशभरातील अल्पसंख्यांक, दलित, मागासवर्गीय, ओबीसी, भटके-विमुक्त, बौद्ध समाज तसेच युवकांना सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एकत्र आणण्यासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याच बैठकीत डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची भारतातील विविध स्तरावरील सामाजिक संघटनांशी समन्वय साधण्यासाठी अखिल भारतीय संयोजक या राष्ट्रीय पदावर नियुक्ती करण्यात आली. या पदाच्या माध्यमातून भारतातील बौद्धसमाज संघटना तसेच जगभरातील बौद्ध अभ्यासकांशी संवाद व समन्वय साधणे, त्यांच्या प्रश्नांवर कार्य करणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानव कल्याणाशी संबंधित उपक्रम राबविणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद वृद्धिंगत करण्याची जबाबदारी डॉ. इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आज 2 जुन रोजी, मुंबई मराठी पत्रकार भवन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रभारी अहमद खान, मुंबई अध्यक्ष फरहान आझमी, राष्ट्रीय समन्वयक व कम्युनिकेशन प्रभारी जीनल एन. गाला, अहमद इक्बाल तसेच इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक जनता या वर्तमानपत्राच्या संपादकीय मंडळाकडून त्यांना प्रजासत्ताक जनताचा अंक आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.अल्पसंख्यांक विभागाचा उद्देश केवळ धार्मिक अल्पसंख्यांकांपुरता मर्यादित नसून दलित, मागासवर्गीय, ओबीसी, भटके-विमुक्त, बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन तसेच विविध वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना संविधानिक मूल्यांच्या आधारे एकत्र आणणे हा आहे. असे स्पष्ट मत डॉ.इंगळे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते पुढे म्हणाले, सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या आधारावर व्यापक लोकशक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध यांच्या धम्म, नैतिकता, लोककल्याण आणि शांततेच्या विचारांचा उल्लेख करत "बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या तत्त्वावर आधारित समाजनिर्मिती हीच काळाची गरज असून सामाजिक न्यायासाठी देशभर काम करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला
आपल्या नियुक्तीबाबत भूमिका स्पष्ट करत आगामी कामकाजाची दिशा मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सामाजिक न्याय, दलित, मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी आपल्या भाषणात विविध सामाजिक प्रश्नांवर चिंता व्यक्त केली. देशात मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढल्याचा दावा करत, महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारांच्या धोरणांवर टीका करत त्यांनी सरकार सामाजिक घटकांसाठी पुरेसे काम करत नसल्याचा आरोप केला आहे.महाराष्ट्रातील काही घटनांचा उल्लेख करताना त्यांनी काही धार्मिक स्थळांवरील कारवाई आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. भीमा कोरेगाव हिंसाचार संदर्भातही त्यांनी उल्लेख करत सामाजिक तणाव आणि अन्यायाच्या मुद्यांवर सरकारला जबाबदार धरले.
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की, यापूर्वी सामाजिक चळवळींमध्ये आणि विद्यापीठ पातळीवर काम केले असून मुंबई विद्यापीठ मध्ये सिनेट सदस्य म्हणूनही कार्य केले आहे.भविष्यात देशभर संघटनात्मक पातळीवर काम करून सामाजिक न्यायाची चळवळ अधिक मजबूत करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबतही विश्वास व्यक्त करत सामाजिक न्यायाच्या मुद्यांवर विरोधकांविरोधात व्यापक जनजागृती करण्याची भूमिका मांडली. येण्राया 5 व 6 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एआयसीसी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभाग व मागासवर्गीय विभागाचे संयुक्त राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात सामाजिक, शैक्षणिक, युवक, संविधानिक आणि संघटनात्मक विषयांवर व्यापक चर्चा होणार आहे. असे डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांनी स्पष्ट केले

0 टिप्पण्या