Top Post Ad

पर्यावरणीय आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक अॅमेझॉनच्या हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्पाला ठाण्यात सत्ताधाऱ्यांचे Red Carpet

वाढती वीज टंचाई, जलसंकट आणि पर्यावरणीय नियमांमुळे अॅमेझॉनचा हायपरस्केल डेटा सेंटर प्रकल्प युरोपमधून नाकारण्यात आला. युरोपमधील आयर्लंड आणि एडिनबर्गसारख्या शहरांमधून विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प आता मुंबई महानगरातील ठाणे (पालवा आणि बाळकुम परिसर) येथे उभारण्यासाठी अॅमेझॉनने प्रचंड गुंतवणूक केली आहे.  मात्र या प्रकल्पामुळे पाणीटंचाई, 24 तास ध्वनिप्रदूषण, तापमानात वाढ, पर्यावरणीय आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याचा आरोप पर्यावरणवादी संस्था करीत आहेत. प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीचा दावा केला जात असला तरी नोकर्या फक्त 60 जणांना मिळणार असून 6 हजार नागरिकांना याचा त्रास होणार असल्याचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात ठाणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. इतरांच्या फायद्यासाठी आमच्या आरोग्याशी खेळू नका, असे खडेबोल सुनावले आहेत.  

 हायपरस्केल डेटा सेंटर्सना शहरांइतकी प्रचंड वीज लागते, ज्यामुळे युरोपच्या ऊर्जा ग्रिडवर ताण येत होता. कार्बन उत्सर्जन, वाढते तापमान आणि थंड ठेवण्यासाठी लागणाऱया पाण्याचा गैरवापर या कारणांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी देखील या प्रकल्पांना मोठा विरोध केला.  सर्व्हर्स सतत चालू ठेवावे लागतात आणि त्यांना जास्त गरम होण्यापासून वाचवण्यासाठी प्रचंड शीतकरण पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. पवन आणि सौर यांसारखे अक्षय ऊर्जा स्रोत अनियमित असल्यामुळे, डेटा सेंटर्सना अखंड बेसलोड वीज पुरवठ्याची गरज असते. या अविरत मागणीमुळे अनेकदा प्रादेशिक वीज कंपन्यांना जुने जीवाश्म इंधन प्रकल्प चालू ठेवावे लागतात किंवा नवीन नैसर्गिक वायू सुविधा उभाराव्या लागतात, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते. उष्णता व्यवस्थापनामुळे आणखी एक पर्यावरणीय संघर्ष निर्माण होतो असे स्पष्ट मत पर्यावरणवादी मांडत आहेत. 

तसेच अनेक डेटा सेंटर्स सर्व्हर रॅक्सना कार्यरत तापमानावर ठेवण्यासाठी बाष्पीभवनशील कूलिंग टॉवर्सचा वापर करतात. या सुविधा अनेकदा अशा प्रदेशांमध्ये उभारल्या जातात जिथे जमीन स्वस्त असते, पण पाणी दुर्मिळ असते. स्थानिक जलसाठ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी काढल्यामुळे, विशेषत दुष्काळप्रवण भागांमध्ये, स्थानिक समुदाय आणि परिसंस्थांवर प्रचंड ताण येतो.  वीजपुरवठा खंडित झाल्यावर अखंडित कामकाजाची हमी देण्यासाठी, ही केंद्रे मोठ्या डिझेल बॅकअप जनरेटरवर अवलंबून असतात. या जनरेटरची नियमितपणे चाचणी करावी लागते, ज्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड आणि सूक्ष्म कण सभोवतालच्या हवेत उत्सर्जित होतात, आणि त्यामुळे स्थानिक हवेची गुणवत्ता खालावते. शिवाय, तांत्रिक प्रगतीच्या वेगवान गतीमुळे सर्व्हर हार्डवेअरचे आयुर्मान साधारणपणे फक्त तीन ते पाच वर्षे असते. या जलद उलाढालीमुळे प्रचंड प्रमाणात इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो, ज्यात विषारी जड धातू असतात आणि ज्यांचा सुरक्षितपणे पुनर्वापर करणे अत्यंत कठीण असते.  

डेटा सेंटर्स प्रचंड, प्रचंड प्रमाणात वीज वापरतात. ते शीतलक म्हणून पाण्याचा वापर करतात आणि वापरलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणासाठी कोणताही अतिरिक्त कर न भरता ते पाणी गटार व्यवस्थेद्वारे बाहेर सोडतात. तरीही वीज आणि सांडपाणी या दोन्ही बाबतीत विशेष सवलती देण्याचा शासनाचा मानस म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे उच्चाटन करणे असेच असल्याचा आरोप अनेक नागरिक करीत आहेत. आज डेटा सेंटर्स हे आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांचे मूलभूत घटक असले तरी, त्यांच्या अनियंत्रित विस्तारामुळे गंभीर आव्हाने निर्माण होतात, असे पर्यावरण तज्ञांचे मत आहे  

 अॅमेझॉन डेटा सर्व्हिसेसने ठाण्यातील बाळकुम (कल्पतरू ग्रुप) येथे 54 एकर जागा आणि पालवा-अंबरनाथ (लोढा ग्रुप) येथे सुमारे 48 एकर जागा अशा मोठ्या जमिनी विकत घेतल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रस्तावानुसार येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. ठाणे पालिकेच्या महासभेतील विषय पत्रिकेत हा प्रस्ताव घुसवण्यात आला असला तरी नगरसेवकांना या प्रकल्पाविषयी समजू नये म्हणून गोषवारा दिलेला नाही.  

आधीच 30 एमएलडी पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे 12 एमएलडी पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस आहे, असा आरोप  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

ठाणेकरांचे पाणी, वीज घेऊन अॅमेझॉन कंपनी आपल्या सीएसआर फंडामधून ठाण्यात 50 निवारे बांधणार आहे. म्हणजेच या प्रकरणात देवाण-घेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच महासभेच्या विषय पत्रिकेवर हा विषय आणला असताना गोषवारा मात्र देण्यात आलेला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com