डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथील ऐतिहासिक बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसच्या पाडकामप्रकरणी मुंबई पोलिसांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. २४ जून २०१६ च्या मध्यरात्रीनंतर २५ जूनच्या पहाटे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची इमारत पाडण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मध्यरात्री करण्यात आलेल्या पाडकामावर आश्चर्य व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्तांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले. जवळपास दशकभरापूर्वी घडलेल्या या घटनेवेळी मोठा जमाव जमणार असल्याची कोणतीही गुप्तचर माहिती पोलिसांना मिळाली नव्हती, असे मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार, पहाटे गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला घटनास्थळी सुमारे १५० जणांचा जमाव आढळला. चौकशी केल्यानंतर महापालिकेच्या नोटिशीनुसार कारवाई सुरू असल्याचे संबंधित ट्रस्टच्या प्रतिनिधींनी पोलिसांना सांगितले होते. मात्र, ही कारवाई २४ जूनच्या सकाळी अपेक्षित असताना ती मध्यरात्रीनंतर का करण्यात आली, याबाबत नोंदींमध्ये कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. याशिवाय, या प्रकरणातील दहा आरोपींपैकी सात जणांचे जबाब नोंदविण्यात आले असले तरी रत्नाकर गायकवाड, योगेश वन्हाडे आणि अभय बांबोले यांचे जबाब का नोंदविण्यात आले नाहीत, हेही स्पष्ट होत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. मध्यरात्री पाडकाम करण्यामागील कारणे, घुसखोरी व महत्त्वाच्या हस्तलिखितांच्या चोरीचे आरोप तसेच इतर संबंधित मुद्द्यांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अतिरिक्त पोलिस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) यांना देण्यात आल्याची माहितीही देवेन भारती यांनी न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे आंबेडकरी समाजासह विविध संघटनांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या