Top Post Ad

सेवन हिल हॉस्पिटलच्या खाजगीकरणाविरोधात अंधेरी विकास प्रतिष्ठानचा एल्गार

अंधेरी येथील अद्ययावत सेव्हन हिल्स हॉस्पिटल असलेली सुमारे 77 हजार 500 चौरस मीटर  जागा उद्योगपती मुकेश अम्बानी याना  देण्यात आली असल्याची माहिती मुंबईचे माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश  शर्मा यांनी आज प्रसार माध्यमांना दिली. या रुग्णालयात आता अम्बानि कंपनीची माणसे बसली असून मागच्या दाराने सर्व कारभार ही मंडळी करत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला.  तर  हजारो चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या आणि जवळपास 19 ते 20 लाख चौरस फूट बांधकाम असलेल्या या रुग्णालयाची किंमत हजारो कोटी रुपयांमध्ये आहे. मात्र, तुलनेने अत्यल्प मोबदल्यात ही मालमत्ता खासगी संस्थेकडे देण्याचा प्रयत्न होत असून या व्यवहारामध्ये किमान  4 हजार कोटीचा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप त्या विभागातील विद्यमान नगरसेवक प्रमोद सावंत यांनी केला.  

या विरोधात अंधेरी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यापक जनआंदोलन करून सरकारला या रुग्णालयाचे खाजगीकरण रोखण्यास भाग पाडले जाईल असा इशारा आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांनी दिला. हे हॉस्पिटल कोणत्याही परिस्थितीत खासगी उद्योगसमूह किंवा कंपनीकडे देऊ नये आणि त्याचे संचालन मुंबई महानगरपालिकेमार्फतच सुरू ठेवावे,  या मागणीसाठी लवकरच स्थानिक नागरिकांच्या सामूहिक सह्यांची मोहीम, विरोध प्रदर्शन, धरणे आणि विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 

वृत्तपत्रांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सेवन हिल हॉस्पिटलचे व्यवस्थापन उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मे. क्रॉप्रि ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानने पुन्हा एकदा तीव्र विरोध नोंदविला आहे. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2025 रोजी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आंदोलन करण्यात आले होते.   प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी सांगितले की, पश्चिम उपनगरातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या या रुग्णालयातून हजारो गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना उपचार मिळाले आहेत. विशेषत कोविड-19 महामारीच्या काळात हजारो रुग्णांवर उपचार करून या रुग्णालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  

नगरसेवक प्रमोद सावंत म्हणाले, तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी डिसेंबर 2025 मध्ये घाईघाईने हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करून हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचा व्यवहार खासगी कंपनीच्या फायद्यासाठी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल खासगी हातात गेल्यास सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी आरोग्यसेवा धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करताना मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा खर्च होत असताना सार्वजनिक रुग्णालय खासगी संस्थेकडे सोपविण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला. 

संबंधित प्रस्ताव अद्याप सुधार समितीकडे प्रलंबित असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. सेवन हिल हॉस्पिटल हे सर्वसामान्य मुंबईकरांचे रुग्णालय आहे. ते कोणत्याही परिस्थितीत खासगीकरणाच्या घशात जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका अंधेरी विकास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केली.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com