Top Post Ad

MSME क्षेत्रासाठी सुलभ, स्वस्त व जलद कर्जपुरवठ्याची आवश्यकता

देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहेत. मात्र, बँका व वित्तीय संस्थांनी स्थिर व्याजदराचा लाभ प्रत्यक्ष उद्योगांपर्यंत पोहोचविणे, कर्ज मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, तारणासंबंधी अडचणी कमी करणे आणि MSME क्षेत्राला आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) चे अध्यक्ष संदीप परीख यांनी व्यक्त केले.

MSME क्षेत्राच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय सावध पण सकारात्मक म्हणता येईल. तो पूर्णपणे अनुकूल नसला तरी प्रतिकूलही नाही. व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नसल्याने उद्योगांच्या कर्जावरील व्याजाचा भार वाढणार नाही तसेच खेळते भांडवल (Working Capital) आणि टर्म लोनचे नियोजन सुलभ होईल.सध्या जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती, वाढत्या इंधन किमती आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय उद्योगांना काही प्रमाणात दिलासा देणारा आहे. महागाई नियंत्रणात राहिल्यास कच्चा माल व इतर उत्पादन खर्चांवरील दबाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

तथापि, व्याजदरात आणखी कपात झाली असती तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या कर्जाचा खर्च कमी झाला असता. अनेक उद्योग अजूनही आर्थिक अडचणींमधून सावरत असून उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उद्योग विस्तारासाठी स्वस्त वित्तपुरवठ्याची गरज कायम आहे. केवळ रेपो दर स्थिर ठेवणे पुरेसे नाही. बँकांनी MSME क्षेत्राला वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. MSME क्षेत्र हे देशाच्या औद्योगिक विकासाचे, निर्यातीचे आणि रोजगार निर्मितीचे प्रमुख आधारस्तंभ आहे. भारताच्या विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचालीत या क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि बँकिंग क्षेत्राने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थैर्याला प्राधान्य दिल्याचे स्वागत असले तरी वाढते उत्पादन खर्च, विलंबित देयके आणि वित्तपुरवठ्याच्या अडचणी लक्षात घेता MSME क्षेत्रासाठी अधिक सुलभ व कमी खर्चिक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. महागाई नियंत्रणासाठी डिझेल व पेट्रोलियम उत्पादने वस्तू व सेवा कराच्या (GST) कक्षेत आणण्याचा विचार व्हावा. त्याचबरोबर मद्य, गुटखा, तंबाखू व सिगारेट यांसारख्या आरोग्यास अपायकारक वस्तूंवरील कर वाढविण्यात यावा, अशीही मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. असे असोसिएशनचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com