राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट देवून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. ताशी 80 ते 90 पेक्षा वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार अतिवृष्टीमुळे शहरात झाडे व फांद्या पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन कक्षाला भेट दिली. या भेटीत त्यांनी तातडीने सर्व झाडांचे शास्त्रोक्त पध्दतीने ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. संबंधित झाडांची शेवटची छाटणी (ट्रिमिंग) कधी करण्यात आली होती, झाडांची स्थिती काय होती आणि कोणत्या कारणांमुळे ती पडली याचा सखोल अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात पडलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटविण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या हायड्रा, लिफ्टिंग मशीन आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून घेण्याचेही निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. तसेच मनुष्यबळ कमी पडत असल्यास तातडीने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून घेण्याच्या सूचनाही दिल्या. भविष्यात झाडे पडण्याच्या घटना रोखण्यासाठी शहरातील सर्व झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, या प्रक्रियेत वृक्षतज्ज्ञ, उद्यान क्षेत्रातील जाणकार, स्वयंसेवी संस्था तसेच इतर तज्ज्ञांना सहभागी करुन घ्यावे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे किंवा इतर विकासकामांमुळे झाडांच्या मुळांपर्यंत हवा व पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे झाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊन ती वादळी वाऱ्यात कोसळण्याची शक्यता वाढत असल्याने या बाबींचाही अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देताना आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आर्थिक तरतूद तातडीने उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले. तसेच केवळ आपत्ती व्यवस्थापन विभाग नव्हे तर इतर विभागांतील अधिकाऱ्यांनाही गरजेनुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी शहरातील पाणी साचणाऱ्या सखल भागांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे शहरातील सखल भागात 84 ठिकाणी पंप बसविण्यात आले असून त्या पंपांचे नियंत्रण आणि देखरेख आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सातत्याने करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता भासते त्या ठिकाणी तातडीने पंप कार्यान्वित केल्यामुळे पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. पावसाळ्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकारी, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल, तर निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
ठाणे शहरात वृक्ष अंगावर पडून जखमी झालेल्या नागरिकांवर तातडीने उपचार होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. नागरिकांच्या जीवितास कोणतीही हानी होऊ नये, याला सर्वोच्च प्राधान्य द्या, मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करता येते, मात्र एखादा जीव गमावल्यास त्या कुटुंबाचे होणारे दुःख भरून काढता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक दक्षता घेऊन ठाण्यात एकही नागरिकाचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्या, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. .मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा धोका अद्याप कायम असल्याने महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांनी 24 तास सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, उपनगरअभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, रमाकांत मढवी, राजेश मोरे, विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आदी उपस्थित होते.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, प्रभागांमध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये अभियंते, उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी-कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.
ही पथके संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचे त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्यास त्यांचे तातडीने हटविणे तसेच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही करणार आहेत. तसेच संबंधित प्रभागातील सन्माननीय पदाधिकारी व सदस्य यांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे.
यासोबतच, महापालिकेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेशी नियमित समन्वय राखण्यासाठी परिमंडळनिहाय मुख्यालय स्तरावर स्वतंत्र समन्वय पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके प्रभागांतील समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागांकडून तातडीने सोडवून घेण्याचे काम करतील. तसेच समस्या निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित पदाधिकारी व सदस्यांना त्वरित देण्यात येणार आहे.महापालिकेने मान्सून काळात नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून विविध विभागांमधील समन्वय वाढवून आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान राजेश सोनावणे, सहायक आयुक्त, वागळे प्रभाग समिती, स्थावर मालमत्ता विभाग व वृक्ष अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेला वृक्ष अधिकारी या पदाचा कार्यभार केदार पाटील उद्यान अधीक्षक यांचेकडे स्वत:चे कामकाज सांभाळून सोपविण्यात आला आहे. तसेच यासीन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना कामकाजात सुधारणा करणेबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन जिल्ह्यात कुठेही जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्टेशन परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक किंवा वाळलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून त्यांची छाटणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, वीज तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या महावितरणच्या समन्वयाने त्वरित हटवण्यास सांगितले आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले असून तिथे आवश्यक औषधे, रक्तसाठा, डॉक्टर आणि परिचारिकांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे आदेश आहेत. आपत्कालीन उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिका आणि स्थानिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच एक स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे सक्शन पंप, जनरेटर, जेसीबी आणि क्रेन यांसारखी यंत्रसामग्री नेहमी कार्यरत ठेवणे बंधनकारक केले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व जाहिरात फलक (होर्डिंग्ज), एलईडी स्क्रीन, स्वागत कमानी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा जाळ्यांची कडक तपासणी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणारे आणि असुरक्षित फलक तातडीने निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २४ तास नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून क्षेत्रात उपस्थित राहणे अनिवार्य केले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या