Top Post Ad

'क्यूआर कोड आधारित रिअल-टाइम रुग्ण अभिप्राय प्रणाली' सुरू करणारे भारतीय रेल्वेतील पहिले रुग्णालय

मध्य रेल्वेच्या भायखळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटलने डिजिटल आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, 'क्यूआर कोड आधारित रिअल-टाइम रुग्ण अभिप्राय प्रणाली' सुरू केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशी प्रणाली सुरू करणारे हे पहिलेच रुग्णालय आहे.दिनांक १ जुलै  रोजी रुग्णालयात आयोजित 'वैद्यकीय दिन’ कार्यक्रमात डॉ. ममता शर्मा प्रमुख मुख्य वैद्यकीय संचालक यांनी या प्रणालीचे आणि रुग्णालयातील समर्पित सहायता कक्ष सेवेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमास डॉ. एस. कनकराय वैद्यकीय संचालक, डॉ. बीना कुमारी सीएस-II यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर, नर्सिंग अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला आणि रुग्णाप्रती संवेदनशील, रुग्ण-केंद्रित व तंत्रज्ञानावर आधारित आरोग्यसेवा देण्याच्या रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.

क्यूआर कोड-आधारित रिअल-टाइम रुग्ण अभिप्राय प्रणाली एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे आणि मध्य रेल्वेचे भायखळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय ही डिजिटल प्रणाली सुरू करणारे भारतीय रेल्वेतील पहिले रुग्णालय ठरले आहे. या प्रणालीमुळे रुग्ण आणि त्यांच्यासोबतचे नातेवाईक आपल्या मोबाईल फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करून रुग्णालयाच्या सेवांबाबत त्वरित आपला अभिप्राय देऊ शकतात.हा उपक्रम पारदर्शकता वाढवतो आणि रुग्णांचा सहभाग अधिक दृढ करतो. तसेच, यामुळे रुग्णालय प्रशासनाला वेळेवर अभिप्राय मिळणे, सुधारणेसाठी आवश्यक बाबी ओळखणे आणि आरोग्यसेवांच्या गुणवत्तेत सातत्यपूर्ण वाढ करण्यासाठी त्वरित सुधारणात्मक पावले उचलणे शक्य होते.

सदर कार्यक्रमात 'वैद्यकीय दिन' साजरा करण्यात आला. यामध्ये पीसीएमडी यांनी रुग्णसेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल वरिष्ठ डॉक्टरांचा गौरव केला आणि रेल्वे लाभार्थ्यांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली अढळ निष्ठा व मानवतावादी वृत्ती यांची प्रशंसा केली. याच प्रसंगी पीसीएमडी यांच्या हस्ते 'सहायता कक्ष' सेवेचेही उद्घाटन करण्यात आले. हा सहायता कक्ष सर्व कामकाजाच्या दिवसांत ओपीडी वेळेत कार्यरत राहील. याद्वारे ओपीडी नोंदणी, भेटीची वेळ, विविध विभागांची ठिकाणे, निदान चाचण्या, रुग्णालयात दाखल होण्याची प्रक्रिया आणि डिस्चार्ज प्रक्रिया यांबाबत त्वरित मदत पुरवली जाईल. ही सुविधा संपर्काचे पहिले केंद्र म्हणून काम करेल; यामुळे विशेषतः वृद्ध रुग्ण, दिव्यांगजन आणि पहिल्यांदाच येणाऱ्या अभ्यागतांना लाभ होईल, कारण यामुळे हालचाल सुलभ होईल आणि प्रतीक्षा कालावधी कमी होईल. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित आणि रुग्ण-स्नेही उपाययोजना राबवण्यात मध्य रेल्वे सातत्याने आघाडीवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com