श्रमिक जनता संघाने अनेकदा महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार व भेटी दरम्यान अनेक कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. तरीही ठाणे महानगरपालिका कंत्राटी कामगारांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसल्याने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरलिया यांनी प्रलंबित मागण्यासाठीआज ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ठाणे महानगरपालिका येथे धरणे आंदोलन पुकारले. आंदोलनात शिक्षण विभाग, पाणी पुरवठा, रस्ता सफाई, घंटागाडी ,यांत्रिक व मलनिस्सारण विभागासह विविध खात्याचे कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समान कामाला समान वेतन द्या. वैद्यकीय उपचार सुविधा/ मेडिक्लेम पॉलिसी लागू करा. शाळा सफाई कामगारांना महिनाभर काम द्या वेतन द्या, कामावरून वयोमानानुसार कमी केलेले वा मयत झालेल्या कंत्राटी कामगारांना उपदानाची रक्कम अदा करा, वेळेवर वेतन अदा न करणाऱ्या ठेकेदार विरोधात कारवाई करा. लाड -पागे कमिटीच्या शिफारशी लागू करा. आदी मागण्यांचे निवेदन यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर करण्यात आले.
कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर येत्या शुक्रवार पर्यंत आठवड्याभरात अंतिम निर्णय घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसह मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आदेश उप आयुक्त (मुख्य) श्री जी.जी.गोदेपुरे यांना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना दिले. बैठकीत श्रमिक जनता संघ युनियनचे शिष्टमंडळाला देखील चर्चेत सहभागी करून घेतले जाईल, असे आश्वासन या. महापौर यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना दिले.
शिक्षण विभागाचे सफाई कामगारांना येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून महिनाभर काम द्यावे असे आदेश ही उप आयुक्त यांना दिले. १२ मे २०२६ रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ताबडतोब श्रमिक जनता संघ युनियनला उपलब्ध करून देण्यात येईल असे ही आश्वासन त्यांनी दिले. तसेच वैद्यकीय उपचार सुविधाची मागणी रास्त आहे त्याबाबत ही आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
कंत्राटी कामगारांच्या मागण्या या न्यायाला धरून असल्याने आमची पूर्ण सहानुभूती आहे. इतके दिवस तुम्ही वाट पाहत आहात, एक आठवड्यात योग्य निर्णय घेण्यासाठी विश्वास ठेवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उप आयुक्त गजानन गोदेपुरे कामगारांच्या वतीने सरचिटणीस जगदीश खैरालिया, सचिव सुनील दिवेकर, विनायक आम्ब्रे, अर्चना पवार, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, विमल खाडे, भास्कर शिगवण आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

0 टिप्पण्या