अहिल्यानगर येथील तरुण पालिका कर्मचारी धीरज परदेशी यांची कपाळावर टिळा लावल्याच्या कारणावरून झालेली निर्घृण हत्या ही एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परदेशी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी, या प्रकरणाचा सखोल तपास करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि पीडित कुटुंबियांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी, पीडित कुटुंबाची सद्यस्थिती, आरोपींच्या टोळ्या आणि भविष्यातील कायदेशीर व सामाजिक परिस्थिती प्रसार माध्यमांसमोर मांडली. यावेळी दिवंगत धीरज परदेशी यांच्या पत्नी सौंदर्या परदेशी देखील उपस्थित होत्या.

धीरजच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र या प्रकरणात नगरच्या पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद वाटत आहे. मुख्य सूत्रधारांना अटक करण्याऐवजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा आणि मूळ प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपींसह सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.
तसेच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी न्यायालयीन लढा प्रभावीपणे लढला जावा यासाठी अनुभवी आणि सक्षम सरकारी वकील नियुक्त करावा, सौंदर्या परदेशी यांना सरकारी नोकरी देण्यात यावी, तसेच कुटुंबाला आवश्यक आर्थिक आणि सामाजिक मदत शासनाने करावी. अहिल्यानगरमधील मुकुंदनगर परिसरातील एका हल्ल्याचाही संदर्भ देण्यात यावेळी देण्यात आला. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत, पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करावी आणि त्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी देखील जगताप यांनी यावेळी केली.
पीडित परदेशी कुटुंबाच्या म्हणण्यानुसारच योग्य कलमांखाली निष्पक्ष तपास व्हावा. मुख्य मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीच्या शिक्षेसाठी विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती व्हावी. आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवरील स्थगिती उठवून त्वरित कारवाई व्हावी. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विनाकारण टार्गेट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. स्व. धीरज यांच्या पत्नीला शासनाने सन्मानजनक शासकीय नोकरी द्यावी. या सर्व मागण्या आणि पोलिसांच्या संशयास्पद तपासाची वस्तुस्थिती घेऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत. जोपर्यंत धीरजला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
धीरज परदेशी यांच्या पत्नी सौंदर्या परदेशी यांनी सांगितले की, ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता घटनेपूर्वी माझे पती धीरज यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. त्यावेळी धीरज यांनी “जेवण केले आहेस का?” अशी विचारणा केली. आणि त्यांनी लगेच फोन कट केला. त्यानंतर जे घडले ते जगासमोर आहे. यामुळे आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून, अशा घटनेमुळे हिन्दु समाजाने घाबरून रहावे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हा कुटुंबियांना न्याय द्यावा. आमचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, आम्हाला न्याय मिळावा अशी भूमिका सौंदर्या परदेशी यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली.
0 टिप्पण्या