मुंबई प्रभादेवी येथील रुस्तमजी क्राऊन या इमारतीतील मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून तसेच चटइ क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनुषंगाने करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट रोजी निष्कासन कारवाई करण्यात आली. या दोन दिवसांच्या कारवाईत एकूण ९ सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे व फेरबदल निष्कासित करण्यात आले. निष्कासन कारवाई सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने १५ कामगार, २ मुकादम, ४ अभियंते आणि ८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अशा प्रकारे २४ आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी रुस्तमजी क्राऊनमधील एकूण ९ सदनिकांवरील अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात निष्कासन कारवाई पूर्ण करण्यात आली. उर्वरित पात्र प्रकरणांमध्येही विहित वैधानिक प्रक्रिया राबवून पुढील कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रुस्तमजी क्राऊन ही इमारत ३ तळघर + तळमजला + ६३ मजले अशा स्वरूपाची आहे. इमारतीतील १ ते १२ मजले वाहनतळासाठी, १० वा व ११ वा मजला फिटनेस सेंटरसाठी, १३ वा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी, तर १४ ते ६३ मजले निवासी वापरासाठी आहेत. निवासी भागात A, B आणि C अशा तीन विंगचा समावेश आहे. A आणि B विंगला भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) प्राप्त झाले असून, दोन्ही विंगमध्ये प्रत्येकी १८६ सदनिका आहेत. या इमारतीतील एफएसआय उल्लंघन तसेच अनधिकृत बांधकामे व फेरबदलांबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने A आणि B विंगमधील संबंधित सदनिकांना मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) मधील संबंधित तरतुदींनुसार एकूण १३८ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
संबंधितांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांचे म्हणणे, कागदपत्रे व स्पष्टीकरण सादर करण्याची तसेच सुनावणीची संधी देण्यात आली. संबंधितांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे, म्हणणे आणि उपलब्ध अभिलेखांचा विचार करून लागू प्रकरणांमध्ये सकारण आदेश (Speaking Orders) पारित करण्यात आले. यानंतर वैधानिक कार्यवाही पूर्ण झालेल्या आणि सकारण आदेश पारित झालेल्या सदनिकांमधील अनधिकृत बांधकामे व फेरबदलांविरोधात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी निष्कासन कारवाई करण्यात आली. महानगरपालिका कर्मचारी आणि नियुक्त निष्कासन कंत्राटदाराच्या माध्यमातून विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान काही सदनिकांमध्ये सामाईक लॉबीचा भाग लाकडी साहित्य आणि हलक्या वजनाच्या सिपोरेक्स विटांचा वापर करून अनधिकृतरीत्या बंदिस्त करण्यात आल्याचे आढळले. हा भाग सदनिकेच्या राहण्यायोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. तसेच, किचन डक्टचा भाग एम.एस. प्लेटच्या सहाय्याने बंदिस्त करून तो स्वयंपाकघराच्या क्षेत्रात अनधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला होता. काही ठिकाणी व्हेंटिलेशन शाफ्टचा भाग एम.एस. प्लेटने बंदिस्त करून सदनिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता आणि त्याचा वापर स्टोअर रूम म्हणून केला जात होता. याशिवाय, रूमचा काही भाग सिपोरेक्स साहित्याचा वापर करून स्वयंपाकघराच्या क्षेत्रात अनधिकृतरीत्या समाविष्ट करण्यात आला होता. संबंधित नोटिसा आणि पारित सकारण आदेशांच्या अनुषंगाने ही सर्व अनधिकृत बांधकामे व फेरबदल निष्कासित करण्यात आले.
0 टिप्पण्या