महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘जलसंधारण दिन’ तसेच 'जलसंधारण सप्ताह' अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज ‘महा वॉकेथॉन - वॉक फॉर वॉटर’ या भव्य जनजागृती रॅलीचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वॉर्म-अप सत्राने झाली. या झुंबा व्यायाम प्रकाराचा उपस्थित सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.
‘माती वाचवा, पाणी जपा - सुरक्षित भविष्य घडवा’ आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महा वॉकेथॉनचा शुभारंभ उपवन तलाव येथून झाला. त्यानंतर आदिवासी आश्रम क्रांतिवीर राघोजी भांगरे चौक, आदिवासी वीरांगना झलकारी बाई मार्ग, वसंत विहार फाटा मार्गे ही रॅली डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पोहोचून संपन्न झाली. सुमारे ३ किलोमीटरच्या या पदभ्रमण मोहिमेमध्ये ठाण्यातील शेकडो नागरिक, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वर्ग आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, ठाण्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६ ते ७ हजारांहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केली होती. संपूर्ण मार्गावर जलजागृतीचे माहिती फलक (फ्लेक्स) लावून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सहभागाची मुदत वाढवण्यात आली असून, नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रील्स तयार करून या जनजागृती चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मृद व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय देवराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेला जलसंधारण सप्ताह हा केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून एक मोठी लोकचळवळ व्हावा, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या प्रचंड उत्साहामुळे रील स्पर्धेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या महा वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी व शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन ठाणे (Government Polytechnic) येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती सुजाता नागरगोजे यांनी माती आणि पाणी हे मानवी जीवनाचे मूळ आधारस्तंभ असून प्रत्येकाने त्याचे नियोजनबद्ध संवर्धन केले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
श्रीमती तरुलता धानके यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश प्रत्येक शेतापर्यंत, बांधापर्यंत आणि तरुणांच्या मनापर्यंत पोहोचून समृद्ध व दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडण्यास मदत होईल. याशिवाय स्थानिक तरुण सहभागी श्री.पवन चौहान आणि श्री. धीरेंद्र चौधरी यांनी नियमित वॉकिंगचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षतोड थांबवणे, झाडे जगवणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, ठाणे शहराचे उपमहापौर कृष्णा पाटील, अधीक्षक अभियंता सूरज शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता फरीद खान, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, तहसिलदार सचिन चौधर, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, गिरीश काळे, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व नागरिक, मान्यवर व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामूहिक मृद व जलसंधारण शपथेने झाली. यामध्ये उपस्थितांनी काळ्या मातीचे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे रक्षण करून जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा आणि सुरक्षित भविष्यासाठी जलसंधारणाचे नियम दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा दृढ संकल्प केला. शेवटी या महा-वॉकेथॉन मधील सहभागींना लकी ड्रॉ (ईश्वरी चिठ्ठी) द्वारे पारितोषिके देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले

0 टिप्पण्या