महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई
आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६. आंतरराष्ट्रीय ते तालुकास्तरावर पारितोषिकांची खैरात
आंतरराष्ट्रीय पारितोषिक - प्रथम पारितोषिक ₹७.५ लाख, - द्वितीय पारितोषिक ₹५ लाख, - तृतीय पारितोषिक २२.५ लाख
राष्ट्रीय पारितोषिक- प्रथम पारितोषिक ₹७.५ लाख, - द्वितीय पारितोषिक ₹५ लाख, तृतीय पारितोषिक ₹२.५ लाख
राज्यस्तरीय पारितोषिक- प्रथम पारितोषिक ₹७.५ लाख, द्वितीय पारितोषिक ₹५ लाख, तृतीय पारितोषिक ₹२.५ लाख
जिल्हास्तरीय पारितोषिक,- प्रथम पारितोषिक ₹५० हजार, - द्वितीय पारितोषिक ₹४० हजार, - तृतीय पारितोषिक ₹३० हजार
तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी १,२५ हजार व प्रमाणपत्र

महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मागील वर्षीपासून 'राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, दि. ११ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे अर्ज
https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. यावर्षी या राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत महाराष्ट्रासोबत देशभरात आणि जगभरात अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनादेखील यावर्षीपासून स्पर्धेत सहभागी होता येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र तीन पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय, जगभरातील पद्धतीने राष्ट्रीय व आतंराष्ट्रीय पारितोषिके जिंकण्याची संधी घ्यावी, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. २०२६ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
यंदाचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर पासून सुरू होत असून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विविध निकषांच्या आधारे अभिप्रायासह गुणांकन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समिती उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांची शिफारस करणार असून, संबंधित मंडळांची नावे, आवश्यक कागदपत्रे, व्हिडीओ व अभिप्राय यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची तारीख तसेच विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पुरस्कार वितरण समारंभाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असेही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या