Top Post Ad

BMC दहिसर-भाईंदर जोडरस्ता... डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्णत्वाचे लक्ष्य

मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेतला आहे. हा मेगा प्रकल्‍प आंतरबदल व जोडरस्‍त्‍यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वेसावे - भाईंदर ही नगरे किनारा रस्‍त्‍याने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर - भाईंदर जोड रस्‍ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांमध्ये (Package) विभागण्यात आले आहे. 


अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजित बांगर यांनी दहिसर - भाईंदर जोड रस्‍ता (पॅकेज ७) अंतर्गत मिरा - भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर आंतरबदल या प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले.  उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम , उपप्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता- उत्तर)  वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते. 

दहिसर - भाईंदर जोड रस्‍ता हा मुंबई आणि मिरा- भाईंदर परिसरातील महत्त्वाचा प्रकल्प असून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम यांच्यात थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण होणार आहे. या रस्‍ते प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ५.१३५ किलोमीटर आहे. त्‍यात उन्नत मार्ग (Elevated Road), खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्‍ता (Roads on Stilts), खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन (Salt pan) क्षेत्रावरील उन्‍नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल (interchanges) आणि उड्डाणपूल आदी विविध प्रकारच्या अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे. 

दहिसर - भाईंदर जोड रस्‍ता प्रकल्‍पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा व ४५ मीटर रूंदीचा मुख्‍य उन्नत रस्‍ता हा मुंबई किनारा रस्‍त्‍याचा (उत्‍तर) अंतिम भाग आहे. या कार्यस्थळास श्री. बांगर यांनी भेट दिली व प्रारंभिक कामांची माहिती घेतली. सद्यस्थितीत गॅबियन भिंतीचे कुंपण  काम सुरू आहे. तसेच, पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल्स (खोल पाया) आणि त्यावर पाइल कॅप तयार करण्यात येत आहे. ६० पायाभूत खांब (Pile), ५ पाइल कॅप (Pile Cap), पुलाचे ४ आधारस्तंभ (Pier),  आधारस्तंभाचा शीर्षभाग (Pier Cap), पुलाचा बांधकाम भाग (Segment) ९ आदी कामे पूर्ण झाली आहेत. कार्यस्थळी अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असून तात्पुरते प्रवेश पूल (Temporary Access Bridge) यंत्रणा कार्यान्वित आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे (Launching Girder) काम सुरू करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  अभिजीत बांगर यांनी घेतली.

प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. त्यासाठी प्राधान्य क्रम निश्चित करावा. विविध प्राधिकरणांसह मिरा - भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे. सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे (SOP) अत्यंत काळजीने पालन करावे. कामे सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यस्थळी बॅरिकेडिंग करावे, कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत. सदर काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. 

***

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प अंतर्गत वेसावे ते भाईंदर दरम्यान विविध पायाभूत सुविधांची कामे प्रगतिपथावर आहेत. या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी भाईंदर येथे अत्याधुनिक कास्टिंग यार्ड (Casting Yard) उभारण्यात आले आहे. या कास्टिंग यार्डमध्ये प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पूर्वनिर्मित काँक्रीट संरचनात्मक घटकांचे (Precast Elements) उत्पादन करण्यात येत आहे. पुलाच्या अंमलबजावणीची गती आणि सेगमेंट तयार करण्याची गती तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. जेणेकरून सेगमेंट अभावी पुलाचे काम रखडता कामा नये, याची दक्षता घ्यावी असे निर्देश बांगर यांनी दिले.

भाईंदर येथील कास्टिंग यार्डमध्ये रस्ते प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पूर्वनिर्मित काँक्रीट संरचनात्मक घटकांची निर्मिती अत्याधुनिक व नियंत्रित वातावरणात करण्यात येते. यामध्ये साचे तयार करणे, त्यामध्ये काँक्रीट ओतणे, आवश्यक तांत्रिक प्रक्रियेनंतर घटकांना अपेक्षित मजबुती प्राप्त होण्यासाठी ‘क्युअरिंग’ करणे तसेच तयार झालेल्या घटकांची काटेकोर गुणवत्ता तपासणी करणे, अशा विविध प्रक्रिया राबविण्यात येतात. येथे तयार होणारे ‘प्रीकास्ट’ घटक पुढे प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी वाहून नेऊन त्यांची नियोजनबद्ध पद्धतीने उभारणी केली जाते. या प्रक्रियेमुळे बांधकामाच्या कामाला गती मिळण्यास मदत होते. तसेच, नियंत्रित वातावरणात निर्मिती होत असल्याने घटकांची गुणवत्ता, अचूकता आणि कामातील सातत्य अधिक प्रभावीपणे राखणे शक्य होते.

 प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कामाची गुणवत्ता, अचूक नियोजन आणि सुरक्षितता या बाबींना सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे श्री. बांगर यांनी अधोरेखित केले. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोर तपासणी करण्यात यावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन सुनिश्चित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com