Top Post Ad

(GMLR) गोरेगाव - मुलुंड जोड रस्ते प्रकल्‍प अंतर्गत भूमिगत बोगदा खोदकामाला वेग

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी  ‘तुळशी’ हे पहिले बोगदा खणन संयंत्र दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले असून आतापर्यंत बोगद्याचे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. तर, 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही ९२ टक्के पूर्ण झाली आहे.

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणा-या बोगद्याचे खोदकाम ‘तुळशी’ या अवाढव्य संयंत्राद्वारे अव्याहतपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत बोगद्याचे ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे उभारण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. यानुसार ६४ मीटरच्या खोदकामा दरम्यान तुळशी संयंत्राच्या मदतीने तब्बल २७ कंकणाकृती कडा देखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरुपातील २ कंकणाकृती कडांचीही उभारणी 'तुळशी'च्‍या मदतीने करण्यात आली आहे. त्‍याची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प)  अभिजीत बांगर यांनी केली.

दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येत आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटर लांबीचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे.‘तुळशी’ बोगदा खनन संयंत्र हे सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील असून कापणी यंत्राचा (Cutter) व्यास १४.४९ मीटर आणि एकूण लांबी ८३ मीटर आहे. यात २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅक अप गॅन्ट्री समाविष्ट आहे. या बोगदा खणन सयंत्रामध्‍ये पूर्णपणे स्वयंचलित मलबा (Muck) हाताळणी प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामध्ये ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयर यांचा समावेश आहे. त्यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची कार्यक्षम वाहतूक, अधिक उत्पादनक्षमता आणि सुरक्षित कामकाज सुनिश्चित झाले आहे.

'तुळशी' द्वारे एका बोगद्याचे खोदकाम वेगाने सुरू असतानाच प्रकल्‍पस्‍थळी 'विहार' या दुस-या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही ९२ टक्के पूर्ण झाली आहे. संपूर्ण यंत्रणा प्रकल्‍पस्‍थळी स्थापित झाल्यानंतर कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्‍पस्थळ स्वीकृती चाचणी (Site Acceptance Test - SAT) दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्‍यात येणार आहे. सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्‍यानंतर दुस-या बोगद्याच्‍या खोदकामास दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ पासून प्रत्‍यक्ष सुरूवात केली जाणार आहे.  

आढावा बैठकीत  बांगर म्हणाले की, बोगदा प्रकल्प कामकाजासाठी ‘डॅशबोर्ड’ तयार करावा. त्यात कामकाजाची टक्केवारी, प्रकल्पाची सद्यस्थिती, बोगदा खोदकाम, दररोजचे खोदकाम आणि अपेक्षित पूर्णता, सुरक्षा आणि वेळापत्रक दर्शवावे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाची प्रगती एका नजरेत समजण्यास मदत होईल आणि संबंधित अधिकारी, अभियंते यांना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची पारदर्शक माहिती उपलब्ध होऊ शकेल, असे  बांगर यांनी स्पष्ट केले. प्रकल्प अंतर्गत बोगदा खणन कामाला सुरुवात झाली असून, एका बाजूने सुमारे ६४ मीटर लांबीचे बोगदा खोदकाम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या निर्धारित कालमर्यादेनुसार कामाची गती सातत्याने कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खोदकामात कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामाची प्रगती, उपलब्ध यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी तसेच मनुष्यबळाची आवश्यकता यांचा नियमितपणे आढावा घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

बोगदा खणनाचे काम हे अत्यंत तांत्रिक, गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक स्वरूपाचे असल्याने कामाच्या वेगासोबतच कामगार व अभियंते यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यानुसार, बोगदा खणनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित सुरक्षा मानकांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने व उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी तसेच संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना अधिकारी व यंत्रणांना दिल्या आहेत. हा महत्‍त्‍वाकांक्षी प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार कामाची प्रगती सातत्याने तपासून निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश देण्‍यात आले आहेत.  

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाचा एक महत्‍त्‍वपूर्ण भाग असलेल्‍या गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान १.२६ किलोमीटर लांबीच्‍या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्पामुळे पश्चिम व पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना जलद,सुलभ व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्‍या या संपूर्ण प्रकल्‍पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्‍यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. तसेच, इंधन वापरात बचत, मुंबईच्‍या वायू गुणवत्‍ता निर्देशांकातही (AQI) सुधारणा होईल. एकूणच, मुंबईतील नागरिकांचे राहणीमान सुधारण्‍याच्‍या दिशेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एक महत्‍त्‍वपूर्ण उपक्रम आहे.  

या प्रकल्‍प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान ३ × ३ मार्गिकेच्‍या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिंडोशी न्‍यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे उड्डाणपूल वळून दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. या पुलाचे बांधकाम एक स्‍तंभावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटचे सेगमेंटल बॉक्‍स गर्डर वापरून करण्‍यात आले आहे.  या पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्‍के पूर्ण झाले आहे. त्‍यात एकूण ३१ खांबांची उभारणी, एकूण ३० स्पॅन आदींचा समावेश आहे. खांबांवर तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे (Approach Roads) कामही पूर्ण झाले आहे. पुलाच्या उर्वरित कामांमध्ये रंगरंगोटी, दिशादर्शक फलकांची उभारणी, विद्युत खांब बसविणे, थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आयज तसेच ध्वनीरोधक (Noise Barriers) यांचा समावेश असून, ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीसाठीची क्षमता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी (Load Test) घेण्यात येणार आहे. या चाचणीनंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून दिनांक १५ ऑक्‍टोबर २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सज्‍ज होईल. 

पुलाखालील परिसरातील सर्व रस्ते अडथळे (Barricades) तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करावा. परिसरातील राडारोडा व घनकचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ व वाहतुकीस सुरक्षित ठेवावा. पुलालगतच्या ७.५ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांचे (Slip Roads) काम तातडीने पूर्ण करावे. तसेच, पुलाची अंतिम कामे (Finishing Works) गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश  बांगर यांनी दिले. याशिवाय, पुलावरील व परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांशी आवश्यक समन्वय साधून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल)  राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल)  नरेश मेघराजानी यांच्‍यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com