साहील वाकोडेच्या मृत्यूस कारणीभूत असणा-या आय आय टी प्रशासनावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्वरीत अटक करा या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आय आयटी प्रवेशद्वारावर आंदोलन केले.
यावेळी आय आयटी प्रवेशद्वार व परीसरात पोलीसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता.कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी दिली जात नसतानाही भीम आर्मीने गनिमी कावा करीत आंदोलन व घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अटक करून खाजगी वाहनाने पवई पोलीस ठाण्यात नेले.मुंबई काँग्रेस आंदोलन करत असताना पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलनच दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, पाच मिनिटेही आंदोलन करू दिले नाही. पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली, धक्काबुकी केली. खासदार वर्षा गायकवाड यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली, अटकेनंतर पवई पोलीस ठाण्यात खासदार वर्षा गायकवाड यांचे ठिय्या आंदोलन केले.
मुंबई काँग्रेसने साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेत आज आयआयटी पवईच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलन सुरु असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली, धक्काबुकी केली व त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर खा. वर्षा गायकवाड, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हा अध्यक्ष केतन शाह, भावना जैन, अर्शद आझमी, राजपती यादव, अवनीश सिंग, सुभाष भालेराव, विक्रम सिंग, प्रदूम यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन केले व पोलीसांच्या दडपशाहीचा निषेध केला.
IIT मुंबईमधील विद्यार्थी साहिल वाकोडे या मागासवर्गीय विद्यार्थ्याचा जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून संस्थेने केलेली हत्या आहे. साहिलच्या आत्महत्येस संस्थेतील प्राध्यापक सुर्यनारायण डुल्ला हे जबाबदार आहेत पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव केला जात आहे. साहिलच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा पण त्याआधी संबंधितांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गायकवाड पुढे म्हणाल्या, आयआयटी सारख्या संस्थेतही आरएसएसचा शिरकाव झाला असून जात व धर्माचा शैक्षणिक संस्थांमध्ये शिरकाव होणे अत्यंत चिंताजनक आहे. साहिल वाकोडे याने अत्याचाराला कंटाळून जीवन संपवले, अशा घटना या संस्थेत होत आहेत हेच गंभीर आहे.

0 टिप्पण्या