Top Post Ad

Prof. Hemant Samant समुद्राच्या अथांग विश्वात भारतीय नारी शक्तीचा ध्वज : लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर

 भारतीय सशस्त्र दलातील महिलांनी गेल्या काही दशकांत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र समुद्राच्या अथांग विस्तारात, अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करत, जगाची प्रदक्षिणा करणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व करणे ही अत्यंत असामान्य आणि आव्हानात्मक कामगिरी आहे. भारतीय लष्कराच्या ‘लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर’ यांनी ही जबाबदारी स्वीकारून इतिहास घडविला. ११ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथून सुरू झालेल्या ‘समुद्र प्रदक्षिणा’ या पहिल्या त्रिसेवा महिला जागतिक नौकानयन मोहिमेच्या त्या प्रमुख होत्या. या मोहिमेत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भारतीय सेना नौकानयन जहाज ‘आयएएसव्ही त्रिवेणी’ वरून जगाची प्रदक्षिणा केली. 

२०२५ मध्ये त्या भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सशस्त्र दलातील तीनही सेवांमधील महिला अधिकाऱ्यांना एकत्र आणणाऱ्या ऐतिहासिक मोहिमेची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात आली. त्यांना त्या वेळी सुमारे २१ वर्षांचा लष्करी अनुभव होता.  ‘समुद्र प्रदक्षिणा’ ही केवळ नौकानयनाची मोहीम नव्हती; ती भारताच्या त्रिसेवा समन्वयाची, महिला सक्षमीकरणाची आणि आत्मनिर्भरतेची मोठी परीक्षा होती. या मोहिमेसाठी दहा महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात भारतीय लष्करातील पाच, हवाई दलातील चार आणि नौदलातील एक अधिकारी अशी रचना होती. अनुजा वरुडकर या मोहिमेच्या प्रमुख, तर भारतीय हवाई दलाच्या ‘स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा पी. राजू’ या उपप्रमुख होत्या. त्यांच्यासोबत मेजर ‘करमजीत कौर’, ‘मेजर ओमिता दळवी’, ‘कॅप्टन प्राजक्ता निकम’, ‘कॅप्टन दाऊली बुटोला’, ‘लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुसैन’, ‘विंग कमांडर विभा सिंह’, ‘स्क्वॉड्रन लीडर अरुवी जयदेव’ आणि ‘स्क्वॉड्रन लीडर वैशाली भंडारी’ या अधिकारी होत्या. 

या मोहिमेच्या तयारीसाठी सुमारे तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेण्यात आले. लहान आणि मध्यम समुद्री मोहिमांपासून सुरुवात करून अधिक कठीण परिस्थितीत नौका नयनाचा अनुभव देण्यात आला. प्रशिक्षणामध्ये नेव्हिगेशन, कम्युनिकेशन, स्कूबा डायव्हिंग, प्राथमिक वैद्यकीय मदत, संकट व्यवस्थापन, थकवा नियंत्रण, हवामानाचे निरीक्षण आणि जहाजावरील यांत्रिक कामकाज यांचा समावेश होता. ‘मुंबई’ ते ‘सेशेल्स’ आणि परत ‘मुंबई’ असा मोठा प्रशिक्षण प्रवासही करण्यात आला. या पूर्व तयारीमुळे महिलांना दीर्घकाळ समुद्रात राहण्याची, जहाजाची देखभाल करण्याची आणि अचानक निर्माण होणाऱ्या संकटांवर सामूहिकरीत्या मात करण्याची क्षमता विकसित झाली. 

या मोहिमेसाठी वापरण्यात आलेले ‘आयएएसव्ही त्रिवेणी’ हे सुमारे ५० फूट लांबीचे, ‘पुदुच्चेरी’ येथे स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आलेले नौकानयन जहाज होते. ‘त्रिवेणी’ हे नाव भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीन सेवांच्या संगमाचे प्रतीक मानले गेले. या जहाजातून कोणत्याही कालवा-मार्गाचा शॉर्टकट न वापरता महासागर पार करण्याचे उद्दिष्ट होते. हा प्रवास २५,५०० नॉटिकल मैल म्हणजे समुद्र मार्गाने सुमारे ४७,२२४ किलोमीटर इतका प्रवास. (१ नॉटिकल मैल = १.८५२ किमी धरल्यास २५,५०० × १.८५२ = ४७,२२६ किमी होतात). हा प्रवास रस्त्याने किंवा सरळ रेषेत केलेला नसून महासागरातील निर्धारित नौकानयन मार्गाने करण्यात आला. मोहिमेच्या आंतरराष्ट्रीय निकषानुसार जगाची पूर्ण प्रदक्षिणा सिद्ध करण्यासाठी विषुववृत्त दोन वेळा ओलांडणे, सर्व रेखांश ओलांडणे आणि तीन महान भूशिरांना - ऑस्ट्रेलियातील ‘केप लीविन’, दक्षिण अमेरिकेतील ‘केप हॉर्न’ आणि दक्षिण आफ्रिकेतील ‘केप ऑफ गुड होप’ ला वळसा घालणे आवश्यक होते. चार प्रमुख महासागरांमधून नौकानयन याचा अर्थ मोहिमेच्या मार्गात ‘हिंद महासागर’, ‘दक्षिण महासागर’, ‘प्रशांत महासागर’ आणि ‘अटलांटिक महासागर’ या समुद्री प्रदेशांचा समावेश झाला.

 अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा मात्र दक्षिण महासागरात झाली. हा समुद्र जगातील सर्वाधिक खवळलेल्या समुद्री प्रदेशांपैकी एक मानला जातो. प्रचंड लाटा, जोरदार वारे, कमी तापमान आणि दीर्घकाळ जमिनीपासून दूर राहण्याची मानसिक परीक्षा या सर्वांचा सामना मोहिमेतील अधिकाऱ्यांना करावा लागला. २०२६ मध्ये मोहिमेच्या यशस्वी समारोपानंतर प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतानुसार ‘ऑस्ट्रेलिया’ आणि ‘न्यूझीलंड’ दरम्यानच्या समुद्रात सुमारे ६० नॉट वेगाच्या वाऱ्यात मोठ्या पालाला गंभीर झटका बसला आणि चार ते पाच मीटर उंच लाटांमध्ये जहाजाला परिस्थितीशी झुंज द्यावी लागली. या प्रसंगात वरुडकर यांच्या नेतृत्वाचा कस लागला. या मोहिमेतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नेतृत्वाची त्यांची समतोल शैली. समुद्रात केवळ आदेश देणे पुरेसे नसते; प्रत्येक सदस्याची मानसिक अवस्था, कौशल्य, शारीरिक क्षमता आणि परस्पर सहकार्य यांचा विचार करावा लागतो. दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहणे, सतत बदलणारे हवामान, झोपेची कमतरता आणि तांत्रिक अडचणी यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वरुडकर यांच्या नेतृत्वाखाली संघ भावना आणि परस्पर विश्वासाला विशेष महत्त्व मिळाले. 

‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ लष्करी किंवा साहसी मोहीम नव्हती. राष्ट्रीय सागरी संशोधन संस्थेसोबत सहकार्य करून समुद्रातील सूक्ष्म प्लास्टिक, सागरी जैवविविधता आणि समुद्राच्या आरोग्याशी संबंधित माहिती संकलित करण्याचे कामही या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील ही मोहीम साहस, संरक्षण, विज्ञान आणि पर्यावरण-जागरूकता यांचा संगम ठरली.  सुरुवातीला या मोहिमेत दहा महिला अधिकारी सहभागी झाल्या होत्या; मात्र २०२६ मध्ये परतताना नऊ महिला अधिकारी मुंबईत पोहोचल्या आणि मोहिमेने सुमारे २५,५०० नॉटिकल मैलांचा प्रवास ३१४ दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात चार प्रमुख महासागरांमधून नौकानयन करण्यात आले आणि जागतिक प्रदक्षिणेचे मान्य निकष पूर्ण करण्यात आले. २२ जुलै २०२६ रोजी या ऐतिहासिक मोहिमेचा मुंबईत समारोप झाला. 

लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांचे महत्त्व केवळ त्यांनी एका विक्रमी नौकानयन मोहिमेचे नेतृत्व केले म्हणून नाही. त्यांच्या नेतृत्वाने भारतीय सशस्त्र दलातील महिलांना अत्यंत कठीण आणि पारंपरिकदृष्ट्या पुरुष प्रधान मानल्या गेलेल्या क्षेत्रात स्वतःची क्षमता दाखविण्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केला. भारतीय लष्कराच्या शिस्तीला समुद्री साहसाची जोड देत त्यांनी त्रिसेवा सहकार्याचे प्रभावी उदाहरण घालून दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेने ‘नारी शक्ती’ ही केवळ घोषवाक्यात्मक संकल्पना नसून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होणारी शक्ती आहे, हे दाखवून दिले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांचे नाव भारतीय महिला लष्करी नेतृत्वाच्या आणि आधुनिक भारतीय नौका नयनाच्या इतिहासात विशेष महत्त्वाने नोंदले जाईल. त्यांची ‘समुद्र प्रदक्षिणा’ ही केवळ पृथ्वीभोवतीची नौका यात्रा नव्हती; ती भारतीय महिलांच्या सामर्थ्याची, भारतीय सशस्त्र दलांच्या एकात्मतेची आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या मानवी जिद्दीची प्रदक्षिणा होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com